“गांधीजींच्या विचारांचा आजही खून का होतोय..?” – विचारवंत ॲड. नकुल पार्सेकर यांचा झणझणीत लेख…

98

“गांधीजींच्या विचारांचा आजही खून का होतोय’…. ???
(आज गांधी जयंती, व्यक्त व्हावं असं मनापासून वाटलं. मी ना उजवा… ना डावा… ना संधीसाधू ना लाभार्थी.. माञ गांधींच्या भारत देशातील एक सजग भारतीय नागरिक.)
गांधीजीना ” महात्मा ” कुणी केलं? गांधीजीना “राष्ट्रपिता” म्हणून मान्यता का मिळाली? आजही देशात नव्हे तर अवघ्या जगात गांधीजीचा विचार का पुजला जातो? या प्रश्र्नांची उत्तरं जर स्वच्छ मनाने स्वच्छांजली वाहिली तर मिळू शकतील.
गांधीजींचे विचार हे फक्त भारताला नव्हे तर जगाला तारू शकतात हे ञिवार सत्य आहे. चीन, अमेरेकेसारखे देश इतर विकसनशील देशावर दादागिरी करून राक्षसी विस्तारवादी भूमिका घेऊन वावरत आहेत. त्यामुळे जागतिक शांतता धोक्यात असताना गांधीजींचे विचार जे “तुम्ही जगा आणि इतरांनाही जगू द्या”… पण आज नैतिक मुंल्ये इतकी रसातळाला गेलीत की जसं आपण जेवणात चवीपुरत लोणचं वापरतो गांधीजींच्या बाबतीत फक्त सोयीस्कर राजकारणासाठीच उपयोग केला जातो.

यावर्षी भारताकडे जी-२० परिषदेचं यजमान पद होतं. वीसहून जास्त देशांचे नेते या ऐतिहासिक परिषदेत सहभागी झाले होते. भारतानेही ” वसुधैव कुटुंबकम” हा वैश्विक विचार मांडला. या मुळ विचाराचे जनक गांधीजींच होते. गांधीजींचं जागतिक महत्त्व अधोरेखित करणारी एक महत्त्वाची घटना या परिषदेच्या दरम्याने साऱ्या जगाला पहायला मिळाली. या परिषदेला आलेले सगळे नेते हे अनवाणी राजघाटावर गेले आणि राष्ट्रपित्याच्या समाधी जवळ नतमस्तक झाले. हा कदाचित या परिषदेच्या इव्हेंटचा एक भाग असू शकतो. जागतिक स्तरावर राक्षसी महत्त्वकांक्षे पोटी अशांतता निर्माण करणाऱ्या नेत्यांनाही मनात असो वा नसो या अहिंसेच्या पुजाऱ्याच्या समाधीवर नतमस्तक व्हावं लागतं ही खरी गांधी विचारांची ताकद आणि सामर्थ्य.

देश स्वतंत्र झाला. अखंड भारताची फाळणी झाली… आणि या फाळणीला गांधीजींचंच नेतृत्व जबाबदार. हा झाला इतिहास. मात्र राजकीय नेत्यांना आणि विशेषतः राजकीय पक्षांच्या वाचाळ प्रवक्त्यांना जुनी मढी उरकून सामाजिक, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हल्ली छंदच जडलाय. ज्याला अनेक वृत्तवाहिन्या खतपाणी घालत असतात.
अनेक देशांत गांधीजींचे पुतळे आहेत. या देशात जेव्हा आपले आदरणीय पंतप्रधान जातात तेव्हा वेळात वेळ काढून पुतळ्यासमोर नतमस्तक होतात. हे चित्र एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला याच देशात काही आततायी महाभागांकडून गांधीजींच्या विचारांचा रोज खून होतोय. ज्या प्रमाणे काँग्रेसने स्वातंत्र्यवीरांचा अपमान करण्याचा एक कलमी कार्यक्रम हाती घेतलाय तसाचं गांधीजींची अवहेलना करणारी विषारी वक्तव्य केली जातात. भिडे गुरजी हे मा. विद्यमान पंतप्रधानांचे गुरू… पण हेच गुरुजी अतिशय खालच्या पातळीवर गांधीजींवर टिका करतात. दुसरे एक मतीभ्रष्ट झालेले महाराष्ट्रातील वकील सदावर्ते यांनी तर कहरच केलाय. ज्या नथुराम गोडसेनी गांधीजींवर गोळ्या झाडून त्यांचा खून केला त्या नथुराम गोडसेचें जाहीरपणे उदात्तीकरण करतात. त्यांचा अतिरेक एवढा वाढलाय की त्यांनी चक्क स्टेट ट्रान्सपोर्ट को. आॅ बॅकेच्या अहवालावर अखंड भारताचे भाग्यविधाते नथुराम गोडसे असा उल्लेख करूनच त्यांचे छायाचित्र छापले. अशा विवेक शून्य माणसांच्या वर्तनामुळे गांधीजींना तुम्ही भले बदनाम कराल पण त्यांचे विचार तुम्ही कधीच संपवू शकत नाही. अमळनेर मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत नथुराम गोडसेंचे फोटो झळकले… हा सगळा प्रकार या पुरोगामी महाराष्ट्राला कितपत शोभादायी आहे?
देशाची संपत्ती काटकसरीने वापरली पाहिजे. जेव्हा देशात दुष्काळ होता. अन्नधान्याचा तुटवडा होता तेव्हा देशातील जनतेला एकवेळ उपास करण्याचा सल्ला देवून स्वत: आचरण करणारे देशाचे तत्कालीन पंतप्रधान स्व. लालबहादुर शास्त्री यांची पण आज जयंती. आज देशातील सगळेच नेते या दोन्ही तपस्वी युगपुरुषांचे स्मरण करतील पण त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा विचार करण्याची सुतराम शक्यता नाही. पंतप्रधान असताना शाळेमध्ये आपल्या मुलाच्या प्रवेशासाठी रांगेत उभे रहाणारे लालबहादुर शास्त्री कुठे आणि जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा आपल्या कुटुंबियांच्या भौतिक सुखासाठी चुराडा करणारे आजचे नेते कुठे❓
गांधीजीं खऱ्या अर्थाने फकीर होते. विलायतेहून बॅरिस्टर बनून आलेले ते पहिले भारतीय होते. बॅरिस्टर होवून आल्यावर खरं तर बक्कळ पैसा कमवून इंग्रजाची गुलामी स्विकारून चैनीचं जीवन जगू शकले असते. पण त्यानी इंग्रज सरकार विरोधात बंड पुकारले त्यासाठी सुरुवातीला त्यांनी भारत भ्रमंती सुरू केली. भारतीय समाज दारिद्र्य, गरीबी, अंधश्रद्धा, यामुळे पोखरला गेलाय. त्यासाठी आपण प्रत्यक्ष समस्या ऐकल्या पाहिजेत म्हणून ते चंपारण्याण्त गेले. ज्या घरात ते गेले त्या घरात दोन पुरुष आणि दोन महिला होत्या. एका बाकड्यावर बसल्यावर त्या दोन्ही पुरूषांनी गांधीजींना नमस्कार केला. थोड्या वेळाने घरात असणाऱ्या एका महिलेने गांधीजींना पाणी दिले व ती आत निघून गेली. थोड्या वेळाने दुसऱ्या महिलेने चहा आणून दिला नमस्कार केला आणि ती पण आत गेली. तोपर्यंत गांधीजींनी त्य दोन पुरुषांशी गप्पा मारल्या. आणि जेव्हा निरोप घ्यायची वेळ झाली तेव्हा गांधीजीं म्हणाले “त्या दोघी भगिनींना बाहेर बोलवा मला त्यांचा निरोप घ्यायचा आहे”.माञ एकच महिला बाहेर आली. तेव्हा गांधीजीं पुन्हा म्हणाले दुसरीला पण बोलवा.. तेव्हा ती भगिनी म्हणाली” त्या बाहेर येवू शकत नाही कारण आमच्याकडे फक्त एकचं लुगडं आहे” जेव्हा मी बाहेर यायचे तेव्हा ती ते सोडून देत असे आणि ती बाहेर आली तेव्हा मी तिला ते देत असे”. हे विदारक सत्य ऐकून गांधीजीं अस्वस्थ झाले. त्यानी त्या पुरूषाने सागितले तुमच्याकडे अगदी फाटका तुटका एखादा पंचा असेल तर द्या…. त्या पुरुषाने पंचा आणून दिला आणि गांधीजींनी आपल्या अंगावरचा कोट आणि इतर कपडे त्या पुरूषाकडे दिले… तो फाटका पंचा कमरेला गुंडाळून हा फकीर देशभ्रमणाला निघाला. गांधीजीं समजून घेण्यासाठी गांधीजीं थोडे वाचले पाहिजेत…
… Let’s we follow the path of simplicity and truth.!
हीच खरी स्वच्छ मनाने दिलेली स्वच्छता़ंजली ठरेल. गांधीजी व लालबहादुर या दोन्ही तपस्वी नेत्यांना भावपूर्ण आदरांजली…!

  • ॲड. नकुल पार्सेकर…
    सावंतवाडी, सिंधुदुर्ग – ७७९८७१३४७५