Home ब्लॉग तादात्म्य (Identification) – ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्रा. डॉ. ह .ना. जगताप यांचे...

तादात्म्य (Identification) – ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्रा. डॉ. ह .ना. जगताप यांचे चिंतन..!

38

सुनिता गणिताच्या पेपरमध्ये नापास झाली. त्याचवेळी तिच्या वर्गातील हर्षदाला गणिताच्या पेपरमध्ये १०० पैकी १०० गुण मिळाले. सुनिता स्वतःच्या अपयशाची कबुली देण्याऐवजी हर्षदा माझी चांगली मैत्रीण आहे व तिच्या यशामध्येच स्वतः समाधान पावते. स्वतःची उणीव झाकण्यासाठी इतरांच्या मोठेपणाचा आधार घेतला जातो.हे एक तादात्म्य या विषमायोजनाचे उदाहरण सांगितले जाते. हा एक सौम्य मानसिक आजारच असतो.
अशीच आणखी एक सौम्य मानसिक विकृती म्हणजे परागमन (Regression ) यामध्ये व्यक्ती सध्याच्या अपयशाचा किंवा विचार न करता आपण पूर्वी किती यश मिळविले होते त्या स्मृती जागवून त्यात गुंग होवून जाते. काहीवेळा ती त्यामध्ये इतकी गर्क होते की तिला वास्तवाचे भान रहात नाही.
हे सर्व आठवायचे कारण म्हणजे हल्ली आपले नेतेच नव्हे तर तुम्ही आम्ही सर्वजण या प्रवृत्तींच्या आहारी जात आहोत की काय असे वाटते. आपले पूर्वज किती महान होते यातच गुंगुन जाणे काय किंवा महापुरुषांची नावे घेवून भाषणे करून त्यांच्या मोठेपणात आपल्या उणीवांकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. केवळ आपल्या इतिहास पुरूषांच्या कर्तबगारीचे गोडवे गाण्यात धन्य मानून स्वतःच्या कर्तबगारीकडे दुर्लक्ष करणे व त्यांच्या पुण्याईवर जगणे हा बहुतेक नेत्यांचा कल राहिलेला आहे. आणिआता तर अमुक एक इतिहास पुरुष आमच्या जातीचा होता व तो कसा श्रेष्ठ होता हे सांगण्याची चढाओढ लागलेली दिसते. हे सांगत असताना आपले काय ? इकडे दुर्लक्ष केले जात आहे. कार्ल मार्क्स म्हणत असे की, “धर्म ही अफूची गोळी आहे.” यामध्ये थोडासा बदल करून धर्माबरोबरच इतिहासाचा समावेश करावा की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
ही सौम्य मानसिक विकृती असली तरी हिचे गंभीर मानसिक आजारात होवू शकते. म्हणून वेळीच सावध होवून अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे, अन्यथा गंभीर परिणामाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.!

  • प्रा. डॉ. ह .ना. जगताप