पुस्तके करतात माणसांच्या मस्तकी विवेकाची पेरणी.! – शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांचा ब्लॉग.

65

पुस्तके माणसांच्या मस्तकी विवेकाची पेरणी करत जातात. त्यामुळे शहाणपणाची वाट चालत रहाणे घडत जाते.आज समाजात दिसणारे संघर्ष वाढता आहे..लोक अधिक हिंसक बनता आहेत.माणसांमाणसांमधील भेद वाढता आहेत.माणूसपणा ऐवजी जात,धर्म केंद्रस्थानी येतो आहे.माणसं सत्व हरवत चालली आहे.आपल्यातील माणूसपण आटत चालले आहे.आत्मपरिक्षणाची वाटही हरवत चालली आहे.त्यामुळे आपण कितीही खोटे वागलो तरी त्याचे काहीच वाटत नाही.चांगले वाईट याचा विचारही मनात घर करत नाही.त्यामुळे आपला प्रवास पुन्हा ‘मानव’ च्या दिशेने होतो आहे का ? पुस्तकांशी सोबत करणारा प्रत्येक जन मानव ते माणूस अशा दिशेचे प्रवास करत असतो..आज ते घडत नाही..आज आपले वाचन समाजमाध्यमांच्या पुढे जात नाही.त्यातून आपण बरच काही गमावतो आहोत.त्यामुळे कधीकाळी येथील राजकारणातील माणसं देखील देशातील जनतेसाठी वंदनीय होते..यशवंतराव चव्हाणांसारखी माणसं सतत पुस्तकाच्या सोबतीने जगत होती..आपल्या राज्यातील साहित्यिकांसाठी ते सतत प्रेरक होते.त्यांच्या सन्मासासाठी हात पुढे करत होते.यशवंतराव जीवनभर येथील मातीशी आणि माणसांशी प्रामाणिक राहिले हे पुस्तकांनी दाखवलेल्या जीवनमार्गाचे फलित तर नाही ना..!

मुळात वाचायचे कशासाठी तर आनंदासाठी.वाचन म्हणजे आनंदाची उधळन,रोज नव्या वाटांचा प्रवास आहे..जीवनभर ज्ञानाची उपासना आहे.एकदा आपण पुस्तकांच्या दुनियेत गेलो की जीवनाचा नवा अर्थ उलगडत जातो..मनाची मशागत होते..वाचनाने मस्तकाला सामर्थ प्राप्त होते आणि हदयाला संवेदनशीलता लाभते..आज आपल्या नात्यातील वीण हरवत चालली आहे..ओलावा आटत चालला आहे अशावेळी पुस्तके निश्चित आपल्याला मदत करतील.आज आकाश फाटलेले दिसते आहे..अशावेळी आपल्याला काही सांधे घालायचेच असतील तर आपणच.पुस्तकांशी मैत्री करायला हवी.पुस्तकांशी बोलायला हवे.पुस्तके मग मनातील गुज सांगत राहतील…आणि आपणही बहरत जाऊ.म्हणून लहान वयापासूनच पुस्तकांशी नाते सांगूया.पुस्तकांशी मैत्री करूया…पाहूया हे सारे जमते का ? जीवन बदलाची वाट सापडते का ?

  • संदीप वाकचौरे..