महाराष्ट्रातील मेट्रोपॉलिटियन शहरांमधील रेसिडेन्सी टॉवर्समध्ये ५० % आरक्षण मराठी माणसांसाठी हवे.! – बबन साळगावकर ; महाराष्ट्र विधिमंडळामध्ये सर्व आमदारांनी एकत्र येऊन कायदा करावा!

39

सावंतवाडी : मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक अशा मोठ्या शहरांमधील कमर्शियल कॉम्प्लेक्स टॉवर्स, रेसिडेन्सी टॉवर्स मध्ये 50 टक्के आरक्षण मराठी माणसांसाठी ठेवण्याचा कायदा महाराष्ट्र विधिमंडळामध्ये सर्व आमदारांनी एकत्र येऊन करावा, अशी मागणी सावंतवाडी शहराचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे.

गेली अनेक वर्ष मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं काम संथ गतीने सुरू आहे. त्यातीलच एक सुप्त गतीने टॉवर्समध्ये मराठी माणसाला सदनिका, शॉपिंग गाळे नाकारून परप्रांतीय बिल्डर लोकांचे प्रयत्न सुरू आहेत.

नुकतेच तृप्ती देवरुखकर या महिलेला मराठी असल्याने मुलुंडमधील एका इमारतीत ऑफिससाठी जागा नाकारण्यात आली होती. त्यांनी संबंधित प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता, जो तुफान व्हायरल झाला. तृप्ती यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसैनिक मुलुंडमधील संबंधित इमारतीत पोहोचले. जागा नाकारणाऱ्या पिता-पुत्राला तृप्ती यांची माफी मागायला लावली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेशी संपर्क केला. त्यानंतर तृप्ती देवरुखकर यांनी बुधवारी रात्री उशिरा मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याच्याविरोधात कलम 341, 323, 504 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला. मुलुंड पोलिसांनी यातील दोन्ही आरोपी प्रवीण ठक्कर आणि निलेश ठक्कर यांना रात्री ताब्यात घेतलं.

अशा घटना मुंबई शहरात पुन्हा घडू नयेत, म्हणून महाराष्ट्र विधिमंडळाने कठोर कायदा करून सक्तीने प्रत्येक कॉम्प्लेक्समध्ये 50 टक्के आरक्षण मराठी माणसांसाठी देण्याचे  बंधन घालावे. आज मुंबईमध्ये मराठी मनुष्य उपनगरामध्ये दिसत आहे. काही दिवसानंतर मुंबईत मराठी माणसं   शोधावे लागतील.  मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेत्यांनी मराठी माणसांसाठी सक्षम कायदा तयार करून महाराष्ट्रातील मराठी माणसांना दिलासा द्यावा, अशी विंनंतीही बबन साळगावकर यांनी केली आहे.