लीबिया : लीबियामध्ये सोमवारी आलेल्या महापुरामुळे कित्येक किनारी शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. या पुरामध्ये आतापर्यंत तब्बल सहा हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. लीबियामधील संयुक्त सरकारचे आरोग्य सहाय्यक सचिव सादेद्दीन अब्दुल वाकिल यांनी याबाबत माहिती दिली. भूमध्य समुद्रात आलेल्या डॅनियल वादळामुळे लीबियामध्ये महापूर आला आहे. किनारी भागात असलेल्या एकट्या डेर्ना शहरातच 30 हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता असल्याचं इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनने म्हटलं आहे.
शहरात जाणंही अवघड
सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, किनारी भागातील शहरं एवढी उद्ध्वस्त झाली आहेत, की त्याठिकाणी जाणंही अवघड होत आहे. डेर्ना शहरातील सात एंट्री पॉइंटमधील केवळ दोनच सध्या सुरू झाले आहेत. अधिकारी शहरांमधील मलबा हटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
नागरिक समुद्रात वाहून गेल्याची भीती
दहा हजारांहून अधिक नागरिक मलब्याखाली दबले गेले असावेत, आणि तेवढेच लोक समुद्रात वाहून गेले असण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. किनारी भागांतील शहरांमध्ये सुमारे एक लाख लोक राहत होते, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.






