..अन्यथा कुटुंबासोबत पुन्हा उपोषण छेडणार! ; सुंदर पार्सेकर ; पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर पार्सेकरांचे उपोषण स्थगित.!

539

सिंधुदुर्गनगरी :  आपल्या नुकसानीला जबाबदार असणाऱ्या दोघा पोलिसांविरुद्ध खातेनिहाय चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणीसाठी न्हावेली येथील सुंदर बाबुराव पार्सेकर यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यासमोर पुकारलेलं बेमुदत उपोषण अखेर आश्वासनाअंती स्थगित करण्यात आले.

पोलीस अधिकाऱ्याने खाकी वर्दीचा अनाधिकारे वापर करून आपली मॅक्झिमो प्लस चारचाकी गाडी बेकायदेशीररित्या जप्त केल्याने आपले १९ महिन्याचे सुमारे ९ लाख आणि मेंटेनन्सचे मिळून १३ लाख ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून या नुकसानीला जबाबदार असलेल्या पोलीस कर्मचारी डुमिंग डिसोजा आणि पोलीस गुरु नाईक यांच्यावर कारवाई करून आपल्याला न्याय द्यावा, या मागणीकरिता न्हावेली येथील सुंदर पार्सेकर यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सोमवारपासून बेमुदत उपोषण छेडले होते.

आज मंगळवारी सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे यांनी उपोषणकर्ते पार्सेकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चेअंती त्यांनासदर अपघात प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य तो न्याय देण्यासंदर्भात लेखी आश्वासनाचे पत्र पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्यामार्फत दिल्यानंतर पार्सेकर यांनी आपले बेमुदत उपोषण स्थगित केले. यानंतर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची भेट घेऊन उपोषण करते पार्सेकर यांनी घडलेली घटना कथित केली. यावेळी पोलीस अधीक्षक यांनीही या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे अधिक चौकशी करत असून त्यांचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या भेटीवेळी त्यांच्यासोबत मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे, समीर पार्सेकर उपस्थित होते. उपोषण स्थगित संदर्भात पार्सेकर यांना विचारले असता आपल्याला न्याय न मिळाल्यास पुन्हा आपण आपल्या कुटुंबासमवेत पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण छेडणार असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले.