मालवण : कचरा मुक्त शहर ही संकल्पना अधिक व्यापकतेने राबविण्यासाठी आणि स्वच्छते बाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने स्वच्छता पंधरवडा या अभियानाचे आयोजन केले आहे. या अभियानांतर्गत दिनांक १७ सप्टेंबर २०२३ रोजी देशातील सर्व शहरांमध्ये इंडियन स्वच्छता लीग या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत देशभरातील सर्व शहरे आपल्या नागरिकांच्या संघासह उतरणार असून मालवण नगरपरिषदेने ‘मालवण नेव्हीगेटर्स’ या नावाने संघाची नोंदणी केली आहे. या संघाचे ‘संघनायक’ म्हणून लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच या अभियानाचे ‘ब्रँड अँबेसेडर’ म्हणून हॉटेल व्यावसयीक श्री संजय गावडे, डॉ. राहुल वालावलकर, पत्रकार श्री महेंद्र पराडकर, मालवणी कवी व उद्योजक रुजारिओ पिंटो, पर्यावरण कार्यकर्ता कु. मेगल डिसोजा यांची नियुक्ती करण्यात आली तसेच संघ सल्लागार म्हणून खोबरे यांची नियुक्ती करण्यात आली. प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री संतोष जिरगे यांनी नियुक्ती पत्र देऊन याबाबत घोषणा केली.
इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत दिनांक १७ सप्टेंबर २०२३ रोजी मालवण शहरातील बंदर जेटी येथे सकाळी ७ वाजता Beach Clean-up Drive चे आयोजन करण्यात आले आहे. मालवण शहर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे तसेच शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे या कारणांनी मालवण शहर हे पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणून नावारूपास येत आहे. आपल्या शहराची पर्यटकांना भुरळ घालणारी निसर्ग समृद्धी अबाधित ठेवण्यासाठी व शहर स्वच्छ राखण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे त्यामुळे याअभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी व मालवणचे देशपातळीवर नावलौकिक होण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन श्री संतोष जिरगे यांनी केले.





