तथागत पतसंस्थेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात संकल्प ; अरविंद वळंजू यांची अध्यक्ष पदी निवड.

58

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्ध बांधवांच्या शनिवारी सिंधुदुर्गनगरी येथे पार पडलेल्या संयुक्त सहविचार सभेत सर्व समाजाला संघटित करून सर्व समावेशक अशी ‘तथागत नागरी सहकारी पतपेढी’ नामकरण असलेली पतसंस्था उभारण्याचा संकल्प करून या पतसंस्थेच्या मुख्य प्रवर्तक पदी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अरविंद वळंजू यांची निवड एकमताने करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात असूनही या समाजाची सहकार क्षेत्रात फारशी प्रगती नसल्याने जिल्ह्यात समाजाची किमान एखादी पतसंस्था असावी यासाठी सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संस्थेच्या पुढाकाराने शनिवारी सामाजिक न्यायभवन सभागृहात बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यांची बैठक सूर्यकांत कदम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित
आली होती.

प्रारंभी श्रद्धा कदम यांनी उपस्थित सर्व मान्यवरांना संविधानाची शपथ दिली, त्यानंतर उपाध्यक्ष आनंद धामापूरकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सचिव मोहन जाधव यांनी आपल्या संस्थेने राबविलेले अनेक उपक्रम सांगून पतसंस्थेची जिल्ह्याला कशी गरज आहे हे स्पष्ट केले व सर्वांच्या सहकार्याने आम्ही केलेला हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी खुल्या मनाने चर्चेत सहभागी व्हावे असे आवाहन केले. तर अरविंद वळंजू यांनी पतसंस्था उभारण्यासाठी आवश्यक असलेली नियमावली सांगून सहकार्य करावे असे आवाहन केले.

यानंतर सिद्धार्थ कदम, रमेश कदम, महेश परुळेकर,  ॲड. अशोक रोडे, विद्याधर कदम, विजय कदम, प्रभाकर साळस्कर, श्याम जाधव, संतोष पाटणकर, संदेश डिकवलकर, दीपक पडेलकर इत्यादींनी मनोगत व्यक्त करून संस्थेच्या समस्या व पतसंस्थेचे असलेली गरज याबाबत उहापोह केला व पतसंस्थेच्या उभारण्याचा संकल्प मांडला.

दरम्यान,  पतसंस्थेचे नाव, भाग भांडवल, पतसंस्थेची कार्यकारणी इत्यादीवर चर्चा करून सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संघटना ही जिल्ह्यातील सर्व समावेशक घटकांची संघटना असल्याने त्या पतसंस्थेचे नेतृत्व या पदाधिकाऱ्यांनीच करावे व अन्य सदस्य कोण असावेत याबाबतचा निर्णय त्यांनीच घ्यावा, पण पतसंस्था उभी करावी, जिल्ह्यातील सर्वच बौद्ध बांधव या संस्थेच्या पाठीशी राहतील असा निर्णय यावेळी घेण्यात आला.

शेवटी अध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी सेवानिवृत्त संघटनेने ‘स्नेह, संवाद व समन्वय’ हे ब्रीद घेऊन काम सुरू केले असल्याचे सांगून आम्ही केवळ पतसंस्थेचे सुचक आहोत पतसंस्थेच्या उभारणीसाठी सर्वांचे योगदान आवश्यक असल्याचे सांगून सर्वांनी सहकार्य केलं तर ही पतसंस्था निश्चितच उभी राहील असा आशावाद व्यक्त केला. मोहन जाधव यांनी आभार मानले. यावेळी जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.