बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण आफ्रिका आणि ग्रीस दौऱ्यावरुन भारतात परतले आहेत. ते थेट बंगळुरू विमानतळावर दाखल झाले. ते थेट इस्रोच्या वैज्ञानिकांची भेट घेऊन, त्यांचं अभिनंदन करणार आहेत. 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग करून भारताने विक्रम केला होता. यावेळी पंतप्रधान मोदी ब्रिक्स परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेत होते. त्यांनी ऑनलाईन हे लँडिंग पाहिलं होतं, आणि इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांना फोन करुन त्यांचं अभिनंदन देखील केलं होतं.
विमानतळावर साधला नागरिकांशी संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी बंगळुरू विमानतळाबाहेर नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. पंतप्रधानांनी यावेळी ‘जय विज्ञान जय अनुसंधान’ अशी घोषणाही केली. “(चांद्रयान-3 चं लँडिंग झालं तेव्हा) मी दुसऱ्या देशात होतो, मात्र मी स्वतःला थांबवू शकत नव्हतो. त्यामुळे मी ठरवलं, की भारतात आल्यानंतर पहिल्यांदा बंगळुरूला जाईल. सर्वात आधी त्या वैज्ञानिकांना नमन करेल.”
“आज मी सकाळी लवकर येणार असल्यामुळे इथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली होती, की सध्या प्रोटोकॉल फॉलो करण्याची गरज नाही. मी येऊन वैज्ञानिकांना भेटून जाईल. मित्रांनो, ही वेळ इथं बोलत बसण्याची नाही, कारण माझं मन त्या वैज्ञानिकांना भेटण्यासाठी आतुर आहे.” असंही पंतप्रधान म्हणाले.





