पंतप्रधान मोदींनी इस्रोच्या वैज्ञानिकांचे केले अभिनंदन!

35

बंगळुरू : पंतप्रधान मोदींनी आज सकाळी इस्रोच्या वैज्ञानिकांची भेट घेत ‘चांद्रयान-3’ मोहिमेच्या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. ही मोहीम पार पडली तेव्हा मोदी ब्रिक्स परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेत होते. आपला परदेश दौरा पार पडल्यानंतर थेट बंगळुरूमध्ये दाखल होत, त्यांनी या वैज्ञानिकांची भेट घेतली. चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पार पाडून, भारताने नवा विक्रम केला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. याचं श्रेय हे नक्कीच इस्रोच्या वैज्ञानिकांचं आहे. त्यामुळेच, त्यांचं विशेष अभिनंदन करण्यासाठी पंतप्रधान मोदी बंगळुरूमध्ये दाखल झाले.

23 ऑगस्टला जेव्हा इस्रोने ही मोठी कामगिरी पार पाडली, तेव्हा पंतप्रधान मोदी ब्रिक्स परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेत होते. यावेळी त्यांनी थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून हा ऐतिहासिक क्षण पाहिला होता. त्यांनी इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांना फोन करुन त्यांचं अभिनंदन केलं होतं. तसंच, भारतात आल्यानंतर आपण पहिल्यांदा इस्रोच्या वैज्ञानिकांची भेट घेणार असल्याचंही मोदी यावेळी म्हणाले होते.