खेड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे १३ आणि १४ जुलै रोजी चिपळूण, खेड आणि दापोली दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी खेडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. श्री. जाधव म्हणाले की, राज ठाकरे यांचा सध्याच्या राजकीय घडामोडीमुळे चिपळूणचा दौरा पुढे ढकलण्यात आला होता. पण आता हा दौरा होणार आहे.१३ तारखेला चिपळूण येथील मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत.
त्यानंतर १४ जुलैला खेड येथील मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात येणार आहेत. त्यानंतर राज ठाकरे दापोली व मंडणगडला रवाना होणार आहेत. मनसेकडून ठाकरे गटाला युती संदर्भात कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नाही. हा निर्णय केवळ राज ठाकरेच घेऊ शकतात. त्यांनी तसा निर्णय घेतला, तर आम्ही त्यांच्यासोबत असणार आहोत, असेही ते म्हणाले.
यावेळी खेडचे माजी नगराध्यक्ष व मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, नगरसेवक भूषण चिखले, शहर अध्यक्ष ऋषिकेश कानडे, खेडचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.





