सर्व्हिस रस्त्यावर वाहणारे धबधबे आठ दिवसात बंद होणार..?
कणकवली : कणकवलीतील उड्डाणपुलाच्या ढासळलेल्या बॉक्सेल भागाची दुरूस्ती आधुनिक तंत्रज्ञान वापरून पावसाळ्यानंतर केली जाणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने त्याला मंजुरी दिली आहे. तर उड्डाणपुलावरील पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी प्लंबिंगच्या कामाबाबत संबंधित ठेकेदार आणि अधिकार्यांना सूचना दिल्या आहेत. येत्या आठ दिवसात तेही काम होईल आणि पुलाखालील धबधबे थांबतील, अशी ग्वाही सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा सा.बां. मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
राजापूर येथील भाजपच्या सभेसाठी जाताना ना.रवींद्र चव्हाण हे सोमवारी सकाळी काही वेळ कणकवलीतील शासकीय विश्रामगृहावर थांबले होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आ.अजित गोगटे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष भाई सावंत उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी उड्डाणपुलावरील पाण्याच्या धबधब्यांमुळे सर्व्हीस रोडवरील वाहनचालक आणि पादचार्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल ना. चव्हाण यांचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री. जाधव यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून उड्डाणपुलावरून सर्व्हीसरोडवर कोसळणारे पाणी बंद होण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. पुलावरील पाणी वाहून जाण्यासाठी बसविण्यात आलेल्या पाईपच्या फिटींगचे काम योग्यरित्या न झाल्याने ही समस्या निर्माण झाली होती. मात्र येत्या आठ दिवसात ते काम मार्गी लागेल असे त्यांनी सांगितले.
ना. चव्हाण म्हणाले, कणकवलीतील उड्डाणपुलाच्या बॉक्सेलच्या प्रश्नाबाबत अनेकवेळा चर्चा झाली. आधुनिक तंत्रज्ञान वापरून हे दुरूस्तीचे काम अधिकाधिक सुरक्षित कसे करता येईल यादृष्टीने अधिकार्यांना आपण सूचना दिल्या आहेत. पावसाळ्यात त्या ठिकाणी योग्य ती निगराणी ठेवली जाईल. सुरक्षिततेची योग्य ती काळजी घेवून हे काम पावसाळ्यानंतर केले जाईल असे ना.चव्हाण यांनी सांगितले.
सोनवडे-घोटगे घाटमार्गाच्या कामाबाबत ना. रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले असता या घाटमार्गाच्या कामाबाबत आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. लवकरच आमच्याकडून तुम्हाला गोड बातमी मिळेल असे त्यांनी सांगितले. सिंधुदुर्गात हवामान खात्याने यलो अलर्ट दिला असून पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थानाबाबत जिल्हा प्रशासनाने काय नियोजन केले आहे? या प्रश्नाबाबत बोलताना पालकमंत्र्यांनी याबाबत संबंधित अधिकार्यांची बैठक घेवून योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाऊस आणि हवामानातील बदल लक्षात घेवून प्रशासनाची टीम अलर्ट आहे. समुद्रकिनारी वादळी पावसाने नुकसान होवू नये यासाठी सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.





