विद्यार्थ्यांनी योग्य दिशा निवडल्यास भविष्य उज्ज्वल : भिकाजीं धुरी

46

मडुरा हायस्कूलचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न…

बांदा : विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे योग्य नियोजन करून मेहनत केल्यास भविष्याची दिशा उज्वल होईल.
पालक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयीसुविधा चांगल्या देण्याचा प्रयत्न करतात. उज्वल भवितव्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवा, असे प्रतिपादन शिक्षणतज्ञ निवृत्त प्राचार्य भिकाजी धुरी यांनी केले.

शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व प्रथम पाच क्रमांक मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा कौतुक सोहळा मडुरा हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी शालेय समिती सदस्य प्रकाश गावडे, श्रीकृष्ण भोगले, माधुरी वालावलकर, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष उल्हास परब, पाडलोस सरपंच सलोनी पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश गावडे, माजी उपसरपंच विजय वालावलकर, मुख्याध्यापक सुहास वराडकर, निवृत्त मुख्याध्यापक दशरथ घाडी उपस्थित होते.

विद्यार्थी दशेमध्ये शिस्त अंगीकारल्यास यशाची खात्री दुप्पट होते व जीवनात कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची ताकद येते असे सुरेश गावडे यांनी सांगितले. प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीही विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सामाजिक भावनेने प्रयत्न करतात ही गोष्ट कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन प्रकाश गावडे यांनी केले. जीवनात प्रत्येक व्यक्तीला आदर देऊन यशस्वी वाटचाल करण्यासाठी नेहमी प्रयत्न करत राहणे हे विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे असे उल्हास परब यांनी सांगितले.

सर्वच क्षेत्रांमध्ये मुली आज यशस्वी असताना पहायला मिळतात. मुलांची संख्या गुणवंतमध्ये कमी असलेली दिसते. याचा विचार मुलांनी करायला हवा. व्यवसाय निवडीसाठी प्रत्येकाने आपली क्षमता लक्षात घेतली पाहिजे व तसे प्रयत्न केले पाहिजेत असे प्रशालेचे मुख्याध्यापक सुहास वराडकर सर यांनी सांगितले. ज्या विद्यार्थ्यांना मध्यम गुण मिळालेले आहेत त्यांनी कौशल्यपूर्ण कोर्सची निवड करून आपले भविष्य स्थिर व उज्वल करावे असे दशरथ घाडी यांनी सांगितले.

यावेळी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. जान्हवी पंडीत व मयुरी गावडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सुत्रसंचालन जे. डी. सावंत यांनी केले. उपस्थितांचे आभार ग्रंथपाल प्रतिभा सावंत यांनी मानले.