नायलॉन मांजा ठरला जीवघेणा…!

नागपूर : राज्यात बंदी असतानाही मकरसंक्रात सणानिमित्ताने पंतग उडविण्यासाठी नायलॉन मांजाची  विक्री मोठ्या प्रमाणात होताना दिसतेय. सुरुवातीला पक्ष्यांसाठी धोकादायक ठरत असलेला आता माणसांच्याही जीवावर उठला आहे. नायलॉन मांजामुळे पक्ष्यांना व नागरिकांना गंभीर इजा झाल्याची अनेक प्रकरणे गेल्या काही दिवसांत समोर आली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी नायलॉनच्या मांज्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही अशा मांजाची सर्रासपणे विक्री केली जात आहे. अशातच या मांजामुळे एका 11 वर्षीय मुलाला प्राण गमवावे लागले आहेत.

नागपुरात नायलॉन मांजाने गळा कापल्याने 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. नागपुरच्या जरीपटका परिसरात महात्मा गांधी शाळेतून शनिवारी संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर 11 वर्षीय मुलगा वडिलांसोबत दुचाकीवरुन घरी  परतत होता. त्यावेळी मांज्यामुळे त्याचा गळा चिरला गेला. यानंतर उपचारासाठी मुलाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गळ्याला गंभीर दुखापत झाल्याने प्रचंड रक्तस्राव झाला होता. दरम्यान, रविवारी उपचारादरम्यान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.