वेंगुर्ले पोलीसांतर्फे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती…!

वेंगुर्ले :  वेंगुर्ले पोलीस स्टेशनतर्फे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत कुडाळ तिठा ते मठ भागात वाहतुक नियमांचे पालन करण्यांबाबत जनजागृतीपर मोटर सायकल रँलीचा उपक्रम राबविण्यात आला. असे उपक्रम वेंगुर्ले पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या हद्दीतील गावात राबविण्यात येत आहेत.

वेंगुर्ले पोलीस स्टेशन अंतर्गत रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत तालुक्यातील गर्दीची व वाहनांची मोठय़ा प्रमाणांत वर्दळ असलेल्या भागांत पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस मनोज परुळेकर व पोलीस कर्मचारी, रिक्षा व्यावसायिक, दुचाकी वाहनधारक यांना तसेच सर्वसामान्य नागरीकांना वाहतुक नियमांचे पालन करणे, रिक्षा भाडे नियमानुसार घेणे, वाहने योग्य रित्या त्या जागेवर कोणासही अडथळा येणार नाही अश्या ठिकाणी पार्क करणे, ट्रिपल सिट न घेणे, हेल्मेटचा कायम वापर करणे, फॅन्सी नंबर प्लेट तसेच कर्कश व मोठय़ाने वाजणारे सायलेन्सरचा वापर न करणे याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन करण्यात आले.

वाहतुक पोलीस मनोज परूळेकर यांनी या जनजागृती रँलीच्या समारोप प्रसंगी मठ-कुडाळ तिठा मार्गदर्शन करीत नियम पाळण्याचे आवाहन केले. वेगुर्ले पोलीसांतर्फे सदर कार्यक्रम हा पोलीस निरीक्षक अतुल जाधव, वाहतूक पोलीस काँन्स्टेबल मनोज परुळेकर व पोलीस कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.