गुरुवारी ५२ वाहनांवर कारवाई करून ४१, ५०० रुपयांचा दंड वसूल | बेशिस्त वाहन चालकांवर होणार कारवाई
कणकवली : तालुक्यातील जाणवली पूल ते नरडवे फाटा दरम्यान उड्डाणपूलखालील सर्विस रस्त्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला बेशिस्तपणे वाहन पार्किंग केली जातात. या वाहनांचा मोठ्या प्रमाणात त्रास हा येणाऱ्या – जाणाऱ्या वाहन चालकांना होतो. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडते व मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होते. याचा आढावा घेत कणकवली पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुक सुरळीत करण्याबाबतचे नियोजन करण्यात आले.

तसेच बेशिस्तपणे वाहने पार्किंग करणारे व बेशिस्तपणे वाहने चालवणारे तसेच विना हेल्मेट, विना लायसन, परवाना नसतानाही ट्रिपल सीट गाडी चालवणारे तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी गाड्या पार्किंग केलेल्या व गाड्यांना आरसे व नंबर प्लेट नाहीत अशा गाड्यांवर वाहतूक नियमांतर्गत एकूण ५२ वाहनांवर दंडात्मक कारवाई करून ४१,५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

ही कारवाई कणकवली पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण यांनी केली. यानंतर कणकवली शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी अशा प्रकारच्या बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर व बेशिस्तपणे रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्किंग करणाऱ्या वाहनांवर रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीने कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.





