खळबळजनक.! कुडाळ मध्ये एका नामांकीत हॉटेल मध्ये आढळला मृतदेह | घातपात की अन्य काही ? याबाबत उलटसूलट चर्चा सुरू

411

कुडाळ : एका नामांकित हॉटेलमध्ये मुंबईस्थित महिलेचा मृतदेह आढळून आला. मात्र, हा घातपात की अन्य काही ? याबाबत उलटसूलट चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाचा कुडाळ पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कुडाळ शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये ४० वर्षीय मुंबईस्थित महिला मंगळवारपासून (दि. १३) रूम नं. २०८ मध्ये राहत होती. तर लगतच रूम नं. २०९ मध्ये जिल्ह्यातीलच दोन युवक (एक युवक कुडाळ तालुक्यातील ) राहत होते. हे दोन्ही युवक त्या महिलेच्या संपर्कात होते.

त्यातीलच एका युवकाने त्या महिलेच्या नावे हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. शुक्रवारी ती महिला रूमचे दार उघडत नसल्याने त्या युवकांनी हॉटेलच्या मॅनेजरला कळवले. त्यानंतर कुडाळ पोलिसांपर्यंत ही माहिती पोहोचताच कुडाळचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पाटील घटनास्थळी सहकार्‍यांसमवेत दाखल झाले.

यावेळी रूममध्ये फॅनला दोरीच्या सहाय्याने लटकलेला महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. दरम्यान, कुडाळ पोलिसांनी मृत महिलेच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. यावेळी मृत महिलेच्या संपर्कात असलेले दोन्ही युवक घटनास्थळी होते. या युवकांनी पोलिसांना संशय वाढविणारी माहिती दिली. त्यामुळे या घटनेबाबत गूढ वाढले आहे. अधिक तपास कुडाळ पोलिस निरीक्षक शंकर चिंदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोज पाटील करत आहेत.