देवगड :मिठबांव फाटकवाडी येथे आपल्या आईकडे राहत असलेली नमिता बाळकृष्ण लोके (२६) ही तिची मुलगी निधी बाळकृष्ण लोके (६) हिच्यासमवेत बेपत्ता झाली आहे. २ जुन रोजी सायंकाळी ती घरातून बाहेर पडली. तिच्या पतीने पत्नी व मुली बेपत्ता झाल्याची तक्रार देवगड पोलिस स्टेशन येथे दिली आहे.
बेपत्ता झालेल्या महिलेचे पती बाळकृष्ण सतिश लोके(२६) हे नोकरीनिमित्त मुंबईत राहत असून सौ. नमिता बाळकृष्ण लोके(२६) ही तिची मुलगी निधी बाळकृष्ण लोके(६) हिच्यासमवेत गेली वर्षभर तिच्या आईकडे मिठबांव फाटकवाडी येथे राहत होती. नमिता ही दि.२ जुन रोजी सायंकाळी ५ वाजता आपण मुलीला घेवून पतीकडे मुंबईला जात आहोत असे सांगून घराबाहेर पडली. मुंबईला जाण्यासाठी गाडीत बसल्यानंतर तिने फोन करून पतीलाही मुंबईला मुलीला घेवून येत असल्याचे सांगीतले. गाडीत बसल्यानंतर पतीबरोबर फोनवर रात्री १० वाजेपर्यंत ती बोलली मात्र नंतर तिने फोन उचलला नाही व दुसऱ्या दिवशी सकाळी ती मुंबईलाही पोहचली नाही. पतीने संपर्क करूनही तिचा संपर्क झाला नाही व तिचा शोध लागला नाही म्हणून देवगड पोलिस स्थानकात पत्नी व मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली असून तपास महिला पोलिस नाईक अमृता बोराडे करीत आहेत.





