जिल्हा परिवहन अधिकारी नंदकुमार काळे यांच्याकडून प्राप्त झाली माहिती
सिंधुदुर्ग : अलीकडेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपघातांची संख्या पाहिली तर साधारण अंक आठवू शकत नाही. त्यात बरेच अपघात हे दुचाकींचे आहेत. तर बरेच अपघात हे हेल्मेट विना झालेले आहेत. त्यामुळे अपघातांची वाढती संख्या आणि मृत्यूचे प्रमाण लक्षात घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुध्दा आता हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात पोलिस आणि अन्य शासकीय कर्मचार्यांना सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबतचे आदेश जिल्हा परिवहन अधिकारी नंदकुमार काळे यांनी सर्व विभागाना दिले आहे. मात्र हे आदेश जे कर्मचारी पाळणार नाहीत त्यांच्यावर कार्यालयाच्या परिसरात असणारे सीसीटिव्ही फुटेज तपासून कारवाई करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात हॅल्मेट सक्ती झाल्यानंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात हॅल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक जिल्हा परिवहन विभागाकडुन काढण्यात आले आहे. यात पहिल्या टप्प्यात पोलिस आणि अन्य शासकीय कर्मचार्यांना हे आदेश बंधनकारक आहेत.
त्यानुसार आरटीओ कार्यालयाकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्या नोटीसीनुसार सर्व कार्यालयीन कर्मचार्यांना कळविण्यात यावे तसेच हेल्मेट वापरण्याबाबत त्यांच्यात जनजागृती करण्यात यावी तसेच त्यांनी हेल्मेट न वापरल्यास कार्यालय परिसरातील सीसीटिव्ही फुटेजचा आधार घेवून आरटीओ कार्यालयाला माहिती द्यावी. त्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, असे त्या पत्रात म्हटले आहे.





