कणकवली : बँक ऑफ इंडिया कणकवली शाखेमध्ये आर्म गार्ड सतीश जुवेकर यांना बँक आवारामध्ये सापडलेली सोन्याची चेन त्यांनी प्रामाणिक पणा दाखवत परत केली. सदर चैन त्यांनी तात्काळ शाखाधिकारी यांच्या ताब्यात दिली. उपस्थित ग्राहकांमध्ये कोणाची चैन हरवली असल्याची चौकशी केली. तर उपस्थित ग्राहकांमध्ये कोणाचीही ती चेन नसल्याचे आढळून आले.
शाखाधिकारी रमेश माळी यांनी त्वरित सीसीटीव्ही चेक करून सदरचेन कोणत्या ग्राहकाची आहे याची शहानिशा केली व त्वरित कणकवली पोलीस स्टेशनला कळवण्यात आले.
सदर चेन चे वजन केले असता ती 34 ग्रॅम सोन्याची चेन होती त्याची अंदाजे किंमत २,१४,००० एवढी होती.सीसीटीव्ही द्वारे मिळालेल्या फुटेजच्या आधारे बँक कर्मचाऱ्यांनी चेनच्या मालकाला शोधून काढले व त्यांना संपर्क साधून त्यांची चेन परत करण्यात आली. आर्म गार्ड सतीश जुवेकर, हे माजी सैनिक असून कणकवली शाखेमध्ये 2008 पासून कार्यरत आहेत. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पोलिसां समक्ष ती चेन मालकाला परत करण्यात आली.





