टोल वसुली सुरू होणार ..? | सिंधुदुर्गवासीयांच्या टोल विरोधी लढ्याला यश येणार काय ? हे देखील बुधवारीच ठरणार

219

सर्वसामान्यांचे सरकार टोल वसुलीर सर्वसामान्य सिंधुदुर्गवासीयांना न्याय देणार काय..? | प्रश्न होतोय उपस्थित

कणकवली | मयुर ठाकूर : मुंबई – गोवा महामार्ग पूर्णत्वास आला आणि संपूर्ण सिंधुदुर्गवासी यांचे लक्ष लागले होते ते ओसरगाव येथील टोलनाक्यावर..! तर एकीकडे मुंबई गोवा महामार्गाचे काम अपूर्ण अवस्थेत असताना दुसरीकडे शासन प्रशासनाचा टोल वसुली सुरू करण्याचा घाट सुरू आहे. अखेर ओसरगाव टोलनाक्यावर टोल वसुली करण्याचा दिवस उजाडला असून बुधवारपासून ओसरगाव टोलनाक्यावर टोल वसुली सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देखील हाती आली आहे.

मात्र अनेकदा प्रयत्न करून देखील मागे एक पाऊल न घेणाऱ्या प्रशासनाविरुद्ध उद्या ओसरगाव टोल नाका येथे जनसामान्या नागरिकांचे तीव्र आंदोलन देखील होणार आहे. दरम्यान या आंदोलनाला वेगळे स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत असून, टोल वसुलीसाठी सिंधुदुर्गपासिंगच्या गाड्यांना जर टोल मुक्ती मिळाली तरच हे आंदोलन मागे घेतले जाणार अन्यथा टोलमुक्ती मिळेपर्यंत आंदोलनाच्या माध्यमातून टोल वसुली करू देणार नसल्याचा इशारा देखील काही सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पुढाऱ्यांनी दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेली सिंधुदुर्गनगरी हे कणकवली – देवगड – वैभववाडी तालुक्यातील नागरिकांना याच टोल नाक्यावरून सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग न्यायालय, आरटीओ कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, यासारखी अनेक महत्त्वाच्या शासकीय कामांची ठिकाणे या ठिकाणी असल्यामुळे कणकवली – देवगड – वैभववाडीतून येणाऱ्या लोकांना ओसरगाव टोल नाक्यावर पहिला भुर्दंड पडणार आहे.

अनेक राजकीय पुढाऱ्यांनी बॅनरबाजी करत आंदोलने केली. मात्र त्यातून निष्पन्न काय झाले ? की फक्त दोन दिवसीय प्रसिद्धीकरिता आंदोलने केली.? राज्यात आता असलेले सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार म्हणून ओळखले जाते. मग हेच सरकार जनतेला कशासाठी भुर्दंड सहन करायला लावत आहे असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यामुळे शिंदे – फडणवीस सरकार आता काय भूमिका घेणार.? सर्व पक्षीय नेतेमंडळी एकत्र येऊन टोल विरोधात लढणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.