शिवडाव धरणाचे पाणी गड नदीपात्रात न पोहोचल्याने कणकवली तालुक्यात मोठी पाणीटंचाई.!

73

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर बंधारा कामांच्याही चौकशीची मागणी

कणकवली | मयुर ठाकूर : कणकवली शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या नदीपात्र क्षेत्रातील पाणीसाठा संपल्याने कणकवली शहरातील पाणीपुरवठा शनिवारपासून विस्कळीत झाला आहे. परिणामी ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नागरिकांचेही पाण्यावाचून हाल होत आहेत. आतापर्यंत कधी नव्हे एवढ्या तीव्र पाणीटंचाईला कणकवलीला सामोरे जावे लागले आहे.

दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी उन्हाळाही जास्त तीव्र राहिला. परिणामी, नदीपात्रेही झपाट्याने कोरडी झाली. यात कणकवली शहरातील टाक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या करकीची कोंड येथील पाणीसाठा संपला आहे. त्यामुळे शिवडाव धरण येथील पाणी काही दिवसांपूर्वी सोडण्यात आले आहे. मात्र, हे पाणी अद्याप कणकवलीतील गडनदीपत्रात पोहोचलेले नाही.

त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. याबाबत न. पं. प्रशासनाने १ जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येईल असे जाहीर केले होते. मात्र, सद्यस्थितीत पाणीपुरवठा पूर्णतः विस्कळीत झाला असून शहरातील अनेक भागांमधील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. दरम्यान, शिवडाव धरणाचे पाणी मंगळवारपर्यंत कणकवलीतील गड नदीपात्रात पोहोचेल व नागरिकांची पाणी समस्या दूर होईल, असा विश्वास मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी व्यक्त केला आहे.

पाणी अडविण्यासाठी दरवर्षी घालण्यात येणाऱ्या बंधाऱ्यांचे काम यावर्षी निकृष्ट दर्जाचे आहे. परिणामी, नदीपात्रांमध्ये आवश्यक तेवढ्या प्रमाणात पाणीसाठा होऊ शकला नाही. त्यामुळे कणकवली शहरात आतापर्यंत कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासली. बंधारा कामांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.