नागपूर : काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये दिग्गज नेते आहेत. पण त्यांनी त्यांना ओळखून योग्य जबाबदाऱ्या सोपवल्या नाहीत. अशा निराश लोकांना भाजपने नेहमीच संधी दिली आहे. या शब्दात भाजप वाढविण्याच्या मोहिमेची प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली.
2014 पासून आतापर्यंत भाजपात दाखल झालेल्यांचा आढावा घेतला. हे फोडाफोडीचे राजकारण वगैरे काही नाही. तर हे जोडाजोडीचे राजकारण आहे. येणाऱ्या काळातील निवडणुकीसाठी आम्ही पक्षासाठी मोठी ताकद एकत्र करीत आहोत, असे आमदार बावनकुळे यांनी यानिमित्ताने स्पष्ट केले..
येणाऱ्या महानगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकांमध्ये भाजप शिवसेना (शिंदे गट) युतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मोठे यश मिळालेले दिसेल. शिंदे-फडणवीसांच्या समन्वयामुळे महाराष्ट्रात मोठे परिवर्तन झालेले बघायला मिळेल. त्यासाठी इतर राजकीय पक्षांमध्ये जे चांगले नेतृत्व आहेत, त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये चांगली संधी असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.





