महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिक वितरण…!
पुणे : पुण्यातील स्व.मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरीत आयोजित ६५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा २०२२-२३ च्या पारितोषिक वितरण सोहळ्यात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केले. श्री.फडणवीस यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र केसरी’ विजेता पैलवान शिवराज राक्षे याला मानाची गदा प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाला क्रीडा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ब्रिजभुषण शरण सिंह, महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, खासदार श्रीरंग बारणे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, हिंदकेसरी पै.अभिजीत कटके आदी उपस्थित आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, सामान्य घरातील युवक कुस्ती खेळतात. ते चांगली मेहनत करतात आणि त्यांना तेवढाच चांगला खुराकही लागतो. अशा खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी ऑलिम्पिक स्तरावर यशस्वी राज्यातील मल्लांना ६ हजार ऐवजी २० हजार रुपये मानधन देण्यात येईल. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, रुस्तम-ए-हिंद विजेत्या मल्लांचे मानधन ४ हजारावरून १५ हजार रुपये, अर्जुन पुरस्कार विजेत्यांना ६ हजार ऐवजी २० हजार रुपये, वयोवृद्ध खेळाडूंना अडीच हजार ऐवजी साडेसात हजार रुपये मानधन देण्यात येईल. मागील काळात तीन खेळाडूंना थेट पोलीस उपअधीक्षक पदावर नोकरीची संधी दिली, तशी संधी देण्याचे काम यापुढेही निश्चितपणे करण्यात येईल.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत माती गटातील अंतिम लढतीत पुण्याच्या महेंद्र गायकवाडने सोलापूरच्या सिकंदर शेखचा पराभव केला. गादी गटात नांदेडच्या शिवराज राक्षेने नाशिक हर्षवर्धन सदगीरचा पराभव करून केला. दोन्ही गटातील विजेते पैलवान महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यात महाराष्ट्र केसरी किताबासाठी अंतिम लढत झाली. यामध्ये निकाली कुस्ती करत पैलवान शिवराज राक्षे याने महेंद्र गायकवाडला चितपट करत ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकावला. उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते दोन्ही खेळाडूंना गदा प्रदान करण्यात आली.
श्री.फडणवीस यांच्या हस्ते कुस्तीपटू तयार करणाऱ्या पैलवान उत्तमराव पाटील यांना मानपत्रप्रदान करण्यात आले. या स्पर्धेनिमित्त ‘वेध महाराष्ट्राचा’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.





