नवी दिल्ली : काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या पंजाबमध्ये आहे. आज (शनिवार) या यात्रेद्वारे राहुल गांधी लुधियानाहून कपूरथलापर्यंतचा प्रवास करणार आहेत. या दरम्यान राहुल गांधींनी एक खुले पत्र लिहून देशात कायमस्वरूपी आर्थिक संकट निर्माण होण्याचा इशारा दिला आहे.
राहुल गांधींनी शुक्रवारी लोकांना केंद्रातील विद्यमान सरकारच्या काळात देशात कायमस्वरुपी आर्थिक संकट निर्माण होणार असल्याचा इशारा दिला. “देशातील जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात राहुल गांधी म्हणाले, एक स्पष्ट आर्थिक संकट निर्माण होत आहे. तरुणांमध्ये बेरोजगारी, असह्य भावनेची वाढ, गंभीर कृषी संकट आणि देशाच्या संपत्तीवर पूर्णपणे कॉर्पोरेट कब्जा. लोकांना त्यांचा रोजगार गेल्याची, उत्पन्नात घट होत असल्याची चिंता आहे. याचसोबत त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या स्वप्नाचाही भंग होत आहे. देशात पुन्हा एकदा निराशेचे वातावरण आहे.”





