नीतिमत्ता नसल्‍याने शिंदे राजीनामा देणार नाहीत : आ. वैभव नाईक

vaibhav

कणकवली : नीतिमत्ता गुंडाळून राज्‍यात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा बाजार आता राज्‍यातील जनताच उठवेल असा विश्‍वास आमदार वैभव नाईक यांनी आज व्यक्‍त केला. मुख्यमंत्री शिंदेकडे नीतिमत्ता नसल्‍याने ते राजीनामा देणार नाहीत. पण नीतिमत्तेला धरून हे सरकार स्थापन झालेलं नाही हे सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केलं असल्‍याचे ते म्‍हणाले. राज्‍यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. यावर आमदार वैभव नाईक यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्‍हणाले, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेची हाव कधीच नव्हती.

त्‍यामुळे शिवसेनेचे आमदार फुटल्‍यानंतर त्‍यांनी लगेच नीतिमत्तेला धरून राजीनामा दिला. आज सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारवर स्थापनेवरून ताशेरे ओढले आहेत. चुकीच्या पद्धतीनं सरकार स्थापन झाल्‍याचंही सर्वोच्च न्यायालयानं म्‍हटलं आहे. त्‍यामुळे नीतिमत्तेला धरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यायला हवा. पण शिंदेकडे नीतिमत्ता नसल्‍याने ते राजीनामा देणार नाहीत. नाईक म्‍हणाले, शिवसेनेसोबत गद्दारी करून राज्‍य सरकार स्थापन केलेल्‍या लोकप्रतिनिधींना कधी ना कधी जनतेच्या दरबारात जावेच लागणार आहे. त्‍यावेळी जनता यांना कधीच माफ करणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने राज्‍यपालांची भूमिका कशी चुकीची होती. केंद्राने त्‍यांच्यावर कसा दबाव आणला हे निकालपत्रात नमूद केलं आहे. त्‍यामुळे शिंदे-फडणवीस यांच्याकडे नितिमत्ता राहिलेली नाही हेच स्पष्‍ट होत आहे. तसेच तुम्‍ही कितीही कांगावा केलात तरी जनता तुमचा बाजार उठविल्‍याखेरीज राहणार नाही असेही नाईक म्‍हणाले.