97वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन अमळनेरला | तब्बल 72 वर्षांनंतर जळगावच्या अमळनेरला संधी

67

पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडून घेण्यात येणार 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मांडव 2024मध्ये अमळनेर येथे सजणार असल्याचे महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी पुण्यात जाहीर केले . 1952मध्ये कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समेलनानंतर तब्बल 72 वर्षांनंतर अमळनेरमध्ये संमेलन होणार आहे.

97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महामंडळातर्फे स्थळ निश्चित समिती गठित करण्यात आली होती. या समितीमध्ये महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्वला मेहंदळे, उपाध्यक्ष रमेश वंस्कर, प्रदीप दाते, डॉ. किरण सगर, सुनीताराजे पवार आणि डॉ. नरेंद्र पाठक हे सहभागी होते. या समितीने औदुंबर आणि अमळनेर या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आणि सातारा येथील संस्थेचे दृकश्राव्य सादरीकरण पाहिले. या तीनही संस्थांची संमेलन आयोजनाची तयारी आणि कार्यक्षमता यांचा विचार करून स्थळ निवड समितीने सर्वानुमते मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर या संस्थेचे शिफारस केली आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने त्याला मान्यता दिली आहे.

पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत महामंडळाच्या अध्यक्ष प्राध्यापिका उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला समिती सदस्यांना व्यतिरिक्त प्रकाश पागे प्रा. मिलिंद जोशी, जे जे कुलकर्णी, दादा गोरे, दगडू लोमटे, डॉ. विद्या देवधर, अ. के. आकरे आणि प्रकाश गर्गे हे सदस्य उपस्थित होते.
दरम्यान वर्धा येथे संमेलन पार पडल्यानंतर पुढील संमेलन कुठे होणार याची सगळ्याच साहित्य वर्तुळात चर्चा होती. 97वे संमेलन हे कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्र येथे होईल अशी अटकळ बांधली जात असताना अमळनेर येथे संमेलन होणार असल्याने हा उत्तर महाराष्ट्र येथील साहित्यिक, साहित्य रसिकांना सुखद धक्का आहे.