एसटी महामंडळाचे गेली ५० वर्षे नाट्य स्पर्धेचे आयोजन हे अभिमानास्पद – माधव अभ्यंकर

117

राज्य परिवहन महामंडळ गेली ५० वर्षे विभागीय नाट्य स्पर्धा आयोजित करीत आहे. ही बाब अभिमानास्पद आहे. या स्पर्धेमुळे राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव व कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होत आहे. महामंडळाच्या नाट्य स्पर्धेतील कलाकारांनी भविष्यात व्यावसायीक नाटकात, सिनेमा, मालिका क्षेत्रात यावे. असे उद्गार रात्रीस खेळ चाले फेम अण्णा नाईक अर्थात सुप्रसिद्ध सिने , नाट्य आणि मालिका कलाकार माधव अभ्यंकर यांनी काढले . ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 50व्या आंतर विभागीय नाट्य स्पर्धा आणि कबड्डी स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते . कणकवली येथे आयोजित या समारंभाचे माधव अभ्यंकर प्रमुख पाहुणे होते तर एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने अध्यक्षस्थानी होते .
माधव अभ्यंकर पुढे म्हणाले की , सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली ही सांस्कृतिक राजधानी आहे.

कणकवलीसारख्या ठिकाणी नाट्यमंदिर असून नाट्यप्रेमींमुळे या मंदिरात अनेक नाटके सादर होत आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या नाट्यस्पर्धामध्ये भाग घेणाऱ्या कलाकारांनी आपल्या कलेत सातत्य ठेवले पाहिजे, कारण नाटकांमुळे व्यक्तिमत्व विकास होत असतो.
ते पुढे म्हणाले, दशावतार हा कोकणचा आत्मा आहे. त्यामुळे येथे अनेक गुणवंत कलाकार आहेत. कला, क्रीडा ही क्षेत्रे सुसंस्कृत माणूस घडवित असतात. त्यामुळे त्यांची जोपासना होणे आवश्यक आहे. नाट्य कलेच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास होत असतो.

महाराष्ट राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ५० व्या आंतर विभागीय नाट्य स्पर्धा २०२२ – २३ चा बक्षीस वितरण समारंभ व राज्य परिवहन महामंडळाच्या कबड्डी संघाचा सत्कार समारंभ शुक्रवारी कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात संपन्न झाला.यावेळी ते बोलत होते.
यावेळी राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने , महाव्यवस्थापक अजित गायकवाड, मुख्य कामगार अधिकारी राजेश कोनवडेकर, उपमहाव्यवस्थापक श्रीनिवास जोशी , नाट्य लेखक विलास खानोलकर,सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक अभिजित पाटील,विभागीय वाहतूक अधिकारी व्ही.एस. देशमुख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी शेखर चन्ने म्हणाले, कोकणच्या मातीत अनेक कलाकार आहेत. तसेच कलाप्रेमी माणसेही आहेत. कोकणातील अनेक कलाकार एसटी महामंडळात कार्यरत आहेत.त्यामुळे चार वर्षे आंतर विभागीय नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग विभागाच्या संघाला प्रथम क्रमांक मिळत आहे.त्यामुळेच महामंडळाच्या परंपरेप्रमाणे या स्पर्धेचे पारितोषिक वितरण कणकवली येथे होत आहे. महामंडळातील कलाकारांनी आपली कला जिवंत ठेवून आपल्याबरोबरच महामंडळाचे नाव उज्वल करावे, असेही ते म्हणाले.
विलास खानोलकर म्हणाले, ‘ ‘दशावतार गोविंद हरिश्चंद्राचो’ या माझ्या नाटकाला न्याय देण्याचे काम रंगकर्मी सुहास वरूणकर व त्यांच्या कलाकारांच्या टीमने केले आहे. त्यामुळे मला पुन्हा नाटक लिहायची प्रेरणा मिळाली आहे.त्यामुळे लवकरच माझे दुसरे नाटक आपल्यासमोर येईल अशी घोषणा त्यांनी केली .
पारितोषिक वितरण समारंभानंतर दशावतार गोविंद हरिश्चंद्राचो या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला.
यावेळी प्रथम पारितोषिक विजेते सिंधुदुर्ग विभागाचे ‘दशावतार गोविंद हरिश्चंद्राचो’ या नाटकातील कलाकार तसेच चारही प्राथमिक फेरीतील पारितोषिक विजेते कलाकार, कबड्डी संघातील खेळाडू यांचा सन्मान करण्यात आला. एसटी कामगार संघटना व इंटकच्यावतीने विजेते व पारितोषीक विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. अजित गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. अभिजीत पाटील यांनी आभार मानले. शाम सावंत ,सोनल कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.