अधिकाऱ्यांना धमकी : गाडी देण्यास उशीर झाल्याने घडला प्रकार
कणकवली | मयुर ठाकूर : गाडी देण्यास उशीर होत असल्याने राज्य परिवहनच्या कणकवली आगाराचे वाहन परीक्षक यांना शिवीगाळ केली तसेच वाहतूक निरीक्षक यांच्यासमोर अरेरावी करून धमकीची भाषा वापरून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कणकवली आगाराचे चालक रुपेश ठाकुर यांना निलंबित करण्यात आले आहे. आगार व्यवस्थापक वैभव पडोळे यांनी ही कारवाई केली.
याबाबत उपलब्ध माहितीनुसार, १९ एप्रिल रोजी कणकवली बसस्थानकात रुपेश ठाकुर हे कामगिरीवर जाण्यासाठी आले. यावेळी नियोजित ड्युटीवरील वाहन परीक्षक ए. जी. कदम यास गाडी देण्यास उशीर होत असल्याने त्यांना शिवीगाळ केली. तसेच वाहतूक निरीक्षक कक्षात आले असता वाहतूक निरीक्षक परब यांच्यासमोरही अरेरावी करून अंगावर धावून गेले. परब यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला – असता त्यांच्याशी धमकीची भाषा चालू ठेवणे खात्याच्या हिताचे वापरून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत रुपेश ठाकुर यांना कामावर चालू ठेवणे खात्याच्या हिताचे नसल्याने चौकशीकामी पुढील हुकूम होईपर्यंत त्यांची सेवा २१ एप्रिलपासून निलंबित करावी, असा हुकूम आपण देत असल्याचे आगार व्यवस्थापक वैभव पडोळे यांनी निलंबन आदेशात म्हटले आहे.
अहवाल घेत कारवाई….
प्रकरणी आगार व्यवस्थापक वैभव पडोळे यांनी स्थानकप्रमुखांकडून अहवाल घेत रुपेश ठाकुर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. याबाबत पडोळे यांच्याशी संपर्क साधला असता कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
चालक ठाकूर यांची प्रवासी वर्गाबरोबर देखील असते अरेरावी..
जेव्हा जेव्हा रुपेश ठाकूर हे एखादी बस घेऊन प्रवासी वाहतूक करतात तेव्हा ते अति वेगाने बस चालवत असतात. त्यात एखाद्या प्रवाशाने सूचना केली की बस हळू चालवा तर त्या प्रवाशावर उच्च भाषेत बोलतात. त्यामुळे प्रवाशांच्या देखील रडारवर चालक रुपेश ठाकूर आहेत. यापूर्वी अनेकदा रुपेश ठाकूर यांच्याकडून रस्ते अपघात देखील घडलेले आहेत. अशा एखाद्या कर्मचाऱ्याकडून वारंवार चुका घडत असतील तर त्यावर योग्य वेळीच चपराक बसवणे गरजेचे आहे. मात्र याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.





