ठाणे : कोपरी येथील आनंदनगर भागात शिंदे गट आणि भाजपमध्ये राडा झाल्याचा प्रकार गुरुवारी रात्री उघडकीस आला. शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे भाजपचे पदाधिकारी प्रमोद चव्हाण यांच्याविरोधात ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल करण्यापूर्वी प्रमोद चव्हाण यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर समाजमाध्यमावर लिहील्याचा आरोप शिंदे गटाने केला होता. त्यानंतर नरेश म्हस्के हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह चव्हाण यांच्या कार्यालयामध्येही गेले होते, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर चव्हाण यांच्या बाजूने ठाण्यातील भाजपचे एकही वरिष्ठ नेते कोपरी पोलीस ठाण्यात हजर नव्हते असेहि कळत आहे.
आनंदनगर या भागातून नरेश म्हस्के हे नगरसेवक म्हणून निवडून येतात. याच भागात भाजपचे प्रमोद चव्हाण हे देखील वास्तव्यास असून त्यांनी समाजमाध्यमावर एक मजकूर लिहीला होता. हा मजकूर म्हस्के यांच्या विरोधात असल्याचा आरोप शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला होता. त्यानंतर गुरुवारी रात्री म्हस्के यांचे कार्यकर्ते चव्हाण यांच्या कार्यालयात गेले. त्यावेळेस नरेश म्हस्के सुद्धा होते, अशी माहिती समोर येत आहे. कार्यालयात गेल्यानंतर चव्हाण यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यानुसार त्यांनी कोपरी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्याआधारे चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




