कणकवलीतील स्टॉलधारकांचा प्रश्न अधांतरीच ! कारवाईनंतरही दुकाने उड्डाणपुलाखालीच

96

नगरपंचायत प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष.!

कणकवली | मयुर ठाकूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १७ मार्च रोजी पोलिस बंदोबस्तात कणकवली शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या उड्डाणपुलाखालील भाजी, फळे, फुले, कपडे व अन्य स्टॉल धारकांनी केलेले अतिक्रमण हटविण्यात आले. दोन दिवस स्टॉल हटाव मोहीम राबवल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवसापासूनच स्टॉल धारकांनी उड्डाणपुलाखाली हळूहळू स्टॉल मांडण्यास सुरुवात केली. सर्व स्टॉलधारकांनी महिन्याभरातच उड्डाणपुलाखाली पुन्हा आपले स्टॉल मांडून अतिक्रमण केले आहे. एकंदरीच शहरातील स्टॉलधारकांचा प्रश्न अंधातरीच असून नगरपंचायतीची भूमिका काय राहणार याकडे लक्ष लागून आहे. महामार्ग प्राधिकरण परत स्टॉल हटाव मोहीम राबवेल का? असा प्रश्नही नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

उड्डाणपुलाखाली पुन्हा अतिक्रमण….

महामार्ग चौपदरीकरणानंतर शहरातून उड्डाणपूल तयार करण्यात आले. उड्डाणपूल तयार झाल्यानंतर पुलाखालील रिकाम्या जागेवर शहरातील स्थानिक व तालुक्यातील काही फळे, फुले, भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केले. तसेच उड्डाणपुलाखालील जागा बंदिस्त

करण्यासाठी लावलेल्या रेलिंग काही ठिकाणी तोडून काही लोक तेथे गाड्या पार्किंग करू लागले. याची तब्बल चार वर्षांनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला जाग आल्यानंतर त्यांनी कणकवली शहरातील उड्डाणपुलाखालील व्यावसायिकांचे अतिक्रमण हटाव मोहीम १७ व १८ मार्च रोजी राबवली. उड्डाणपुलाखालील वेगवेगळे पान स्टॉल, भाजी व्यावसायिकांची बांधकामे, अन्य बांधकामे आणि व्यापाऱ्यांनी मांडलेले बस्तान हटविण्यात आले. व्यावसायिकांना नोटीस देऊन पोलिस

बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे उड्डाणपुलाखालील जागेने यावेळी मोकळा श्वास घेतला होता. परंतु, दोन दिवसाने मोहीम थांबवण्यात आल्याने महिन्याभराच्या आतच स्टॉल धारकांनी परत उड्डाणपुलाखालील जागेवर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्याठिकाणी खरेदीसाठी येणारे लोक रस्त्यावरच गाडी लावून खरेदी करत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

जागेविषयी निर्णय घेण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी – नगराध्यक्ष

पुलाखाली विक्रेत्यांनी व्यवसाय सुरू केले. आता याला महिना होत आला आहे. यात त्या व्यावसायिकांचा दोष आहे, असं म्हणता येणार नाही. या व्यावसायिकांना पर्यायी जागा देण्याची जबाबदारी नगरपंचायतीची आहे. मात्र, नगरपंचायतीचा त्याकडे दुर्लक्ष होत आहे. शहरातील उड्डाणपुलाखाली स्टॉल हटवल्यानंतर काही दिवसांतच स्टॉलधारकांनी परत त्याच ठिकाणी आपले बस्तान मांडले.

उड्डाणपुलाखाली स्टॉल धारकांना व्यवसाय करण्यासाठी नगरपंचायतने शहरातील दोन जागा सुचवल्या होत्या. परंतु, ती जागा व्यवसायासाठी योग्य नसल्याने त्या ठिकाणी व्यवसाय करण्यास स्टॉल धारकांनी नकार दिला असल्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले. तसेच त्यांना या जागेविषयी योग्य तो निर्णय घेण्यासाठी पंधरा दिवसाचा कालावधी दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.

… तोपर्यंत पुलाखालीच व्यवसाय स्टॉलधारकांची भूमिका.!

याबाबत स्टॉलधारकांच्या प्रतिनिधीशी संवाद साधला असता, नगरपंचायतीमार्फत अशा कोणत्याही प्रकारची जागा आपणास दाखवली नसल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील उड्डाणपुलाखाली स्टॉल धारकांना हटवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुन्हा मोहीम राबवल्यास स्टॉल धारक आक्रमक पाऊल उचलणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जोपर्यंत व्यवसायासाठी योग्य पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जात नाही तोपर्यंत पुलाखालीच व्यवसाय केला जाईल, अशी भूमिका स्टॉल धारकांमधून दिसत आहे.