कुडाळ : सर्व जाती-धर्मातील जनतेच्या सुरक्षेसाठी तसेच सर्व यंत्रणांचे लक्ष वेधून घेण्यासाठी व सरकारी यंत्रणेकडून तातडीने तपास कामांना वेग मिळावा यासाठी गुरुवार दिनांक 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी बेमुदत उपोषण करत असल्याचे निवेदन कुडाळ येथील बाळा राणे यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना दिले आहे. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात राणे यांनी म्हटले आहे आपल्या जवळील परिसरात काही दिवसापूर्वी एका संघटनेचे अनाधिकृत रित्या कार्यालय सुरू होते ते कार्यालय कुडाळ शहरातील नागरिकांच्या व पोलिसांच्या तत्परतेमुळे कार्यालयावरील फलक काढून बंद करण्यात आले मात्र ते कार्यालय कोणत्या कारणासाठी चालू होते? ते कोण चालवत होते? कुडाळ नगरपंचायतची परवानगी होती का? कोणत्या घटनेची ती तारीख होती? त्या शाखेच्या मुख्य संचालक कोण? त्या शाखेसाठी काम करणारे इतर व्यक्ती कोण? त्या ठिकाणी रात्री अपरात्री मोठ्या संख्येने जे अनोळखी इसम येत होते ते कुठून येत होते? याचा उलगडा होणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील धर्म स्थळांवर लावलेले भोंगे अनाधिकृत रित्या लावल्या आहेत का? त्याचाही उलगडा व्हावा जिल्ह्यात अनोळखी चेहरे जास्त दिसू लागले आहेत त्यामुळे ओळखपत्रे तपासणी मोहीम प्रशासनाकडून राबविली जावी. कुडाळ पान बाजार येथे जी शाखा चालू होती ती दावत ए इस्लामी या नावाची होती. ती संस्था दहशतवादी कारवाया करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती राष्ट्रीय वाहिनीवर प्रसारित झाली होती, त्यामुळे या प्रकारचे दुर्लक्ष करण्यात येऊ नये अशी मागणी बाळा राणे यांनी निवेदनात केली आहे. या निवेदनाची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल व विविध यंत्रणांना पाठविण्यात आल्याचे नमूद केले आहे.




