चंद्रपूर : चंद्रपुरात टेकडीवर फिरत असताना मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात दोन पर्यटकांचा मृत्यू झाला, तर पाच गंभीररित्या जखमी झाले आहेत. वन्य प्राण्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या चंद्रपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला चढवला. टेकडीवर फिरत असताना मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात दोन पर्यटकांचा मृत्यू झाला, तर पाच गंभीररित्या जखमी झाले आहेत.
ही घटना तळोधी बाळापूर वनपरिक्षण केंद्र आणि तळोधी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गोविंदपूर परिसरातील पेरजागड (सेव्हन सिस्टर्स हिल) या टेकडीवर घडली. मृत्यू झालेले पर्यटक नागपूरमधील आहेत. अशोक विभीषण मेंढे (वय – ६२), आणि गुलाबराव पोचे (वय ५८) अशी मृतांची नावे आहेत. जखमींमध्ये सहा वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. मधमाशांच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्याने नागभीड तालुक्यातील सातबहिणींचा डोंगर परिसरात खळबळ माजली आहे. अशोक मेंढे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर गुलाबराव पोचे यांना उपचारासाठी नेत असताना वाटेत मृत्यू झाला.
सातबहिणींचा डोंगर नावाने प्रसिद्ध ही टेकडी उतरण्यासाठी अतिशय अवघड आहे. त्यामुळे मधमाशांनी हल्ला केल्यानंतर पर्यटकांना लवकर खाली उतरता आले नाही. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी घडली. रात्री अकरा वाजता त्यांचा मृतदेह एनजीओच्या मदतीनं डोंगराच्या खाली आणण्यात आला.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात सातबहिणीचा म्हणून एक ठिकाण आहे. या डोंगरावर महादेवाचं मंदिर आहे. या महादेवाचं दर्शन घेण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात. मात्र या डोंगरावर मोठ्या प्रमाणात मधमाशांची पोळी आहेत. शनिवारी दुपारी अचानक मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला, तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात वाघ आणि मानव संघर्ष वाढलेला आहे. वन्यजीवांच्या हल्ल्यात अनेकांचा जीव गेला आहे. वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्याच्या बातम्या आता सामान्य झाल्या आहेत. मधमाशांच्या हल्ल्यात दोघांच्या मृत्यू झाल्यामुळे आता मधमाशांची दहशत पर्यटकात वाढली आहे. मधमाशांच्या हल्ल्यात एकाच वेळी दोघांचा मृत्यू झाल्याची चंद्रपूर जिल्ह्यातील ही पहिलीच घटना ठरली.





