राजस्थानमध्ये पुन्हा गेहलोत विरुद्ध पायलट…?

राजस्थानातील विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर असताना माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरुद्ध नव्याने आघाडी उघडली आहे. भाजपच्या राजवटीतील कथित भ्रष्टाचाराबाबत गेहलोत सरकारने कारवाई करावी या मागणीसाठी पायलट यांनी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे.

आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी, ११ एप्रिल रोजी आपण शहीद स्मारकाजवळ एक दिवसाचे उपोषण करणार असल्याचे पायलट यांनी सांगितले. या घडामोडीमुळे राजस्थान काँग्रेसमधील पायलट आणि गेहलोत गटांमधील सत्तासंघर्ष पुन्हा एकदा उफाळला असून या वर्षांअखेरीस होणाऱ्या निवडणुकांपूर्वी हा तिढा सोडवण्याचे आव्हान केंद्रीय नेतृत्वासमोर असल्याचे सांगण्यात येते.‘‘वसुंधरा राजे सरकारच्या भ्रष्टाचाराबाबत गेहलोत सरकारने काहीही कारवाई केलेली नाही. ४५ हजार कोटी रुपयांच्या खाण गैरव्यवहारात चौकशी करण्याचे आश्वासन विरोधी पक्षात असताना आम्ही दिले होते,’’ असे उपोषणाची घोषणा करण्यासाठी निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पायलट यांनी सांगितले.