पुणे : कर्करोगावरील उपचार कमीत कमी वेदनादायी आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात उपलब्ध व्हावा यासाठी भारतीय डॉक्टरने हाती घेतलेल्या एका संशोधनाची दखल जागतिक स्तरावरील वैद्यकीय नियतकालिकांकडून घेण्यात आली आहे. डॉ. विजय कनुरू यांनी नॅनो कर्क्युमीनच्या वापरातून तोंडाच्या कर्करोगावर औषध विकसित केले असून, वैद्यकीय संशोधनातून त्याबाबत हाती लागलेले निष्कर्षही समाधानकारक आहेत. डॉ. कनुरू यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कर्करोगतज्ज्ञ डॉ. श्रीराम इनामदार या वेळी उपस्थित होते.





