बांदा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मडुरे येथील युवा कलाकार नितेश परीट यांनी साकारलेले व्यक्तीशिल्प पाहून खुद्द ना. नारायण राणे अवाक झालेत. नितेशच्या कलेचे त्यांनी व निलम राणे यांनी तोंडभरून कौतुक केले. मोठा कलाकार होऊन कोकणचे, सिंधुदुर्ग व गावाचे नाव उज्वल कर असा आशिर्वादही त्यांनी दिला. माजी मुख्यमंत्री राणे साहेबांनी शाबासकीची थाप पाठीवर दिल्याने कष्टाचे चीज झाल्याची प्रतिक्रिया नितेश परीट याने सांगितलं. मडुरे येथील युवा कलाकार नितेश परीट यांने केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांचे व्यक्ती शिल्प साकारले आहे. सदर शिल्प त्याने नुकतेच ना. नारायण राणे यांना सुपूर्द केले. शिल्पातील हुबेहूबपणा पाहून सौ. निलम राणे यांनी नितेशची प्रशंसा केली.
यावेळी नितेश म्हणाला, कोकणचे भाग्यविधाते राणे साहेबांचे शिल्प बनवावे अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. मी बनवित असलेल्या शिल्पाबद्दल घाटकोपर पश्चिम भटवाडी येथील सत्कार्य सेवा मंडळचे अध्यक्ष राजेश आडकर यांनी भाजपच्या पदाधिकार्यांच्या मदतीने माजी खासदार निलेश राणे यांना माहिती दिली. त्यांनी शिल्प पाहून त्यात काही बदल सुचविले. त्यामुळे शिल्प आणखी हुबेहूब होण्यास मदत झाली.
माजी खा.निलेश राणे यांनीच राणे साहेबांची भेट घडवून आणली. नारायण राणे व सौ. निलम राणे शिल्प पाहून खूप खूश झाले. नारायण राणे कलाप्रेमी आहेतच. शिवाय कलेचे जाणकार आहेत हे माझ्याशी चर्चा करताना शिल्पमधील बारकावे सांगताना लक्षात आले. त्यांनी मला खूप अभ्यास कर. मेहनत घे. कोणतीही मदत पाहिजे असल्यास सांग असे सांगून आशिर्वाद दिला. माझ्यासाठी ही खूप प्रेरणादायी बाब अाहे, असे नितेश परीट यांनी स्पष्ट केले.
यावेळी नितेशचे वडील प्रफुल्ल परीट, ईशान्य मुंबई युती अध्यक्ष अर्चना निंबाळकर, घाटकोपर पश्चिम युवा मंडळ अध्यक्ष चेतन भाटकर, वाॅर्ड क्रमांक १२३ चे युवा अध्यक्ष अविनाश अवचिते, महेश यादव उपस्थित होते.





