सिंधुदुर्ग : कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लोकप्रिय आणि सदा हाऊसफुल्ल असणारी गाडी कोकणकन्या एक्सप्रेस आहे. कोकण रेल्वे मार्गावर नियमितपणे विद्युतशक्तीवर धावणारी कोकणकन्या एक्स्प्रेस २० जानेवारीपासून एक्स्प्रेसऐवजी ‘सुपरफास्ट एक्सप्रेस’ म्हणून धावणार आहे. यामुळे प्रवासात तब्बल २ तास १० मिनिटांच्या वेळच्या बचत होणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर दररोज धावणारी कोकणकन्या एक्स्प्रेस नेहमीच तुफान गर्दीत धावते. या एक्स्प्रेसमध्ये रेल्वे प्रशासनाने नवा बदल केल्याने वेगवान होणार आहे. आतापर्यंत कोकणकन्या एक्स्प्रेस १०१११/१०११२ क्रमांकासह धावत होती. यापुढे कोकणकन्या एक्स्प्रेस २०१११/२०११२ क्रमांकासह धावेल.
सीएसएमटी मुंबई-मडगाव सुपरफास्ट कोकणकन्या एक्स्प्रेस सीएसएमटी स्थानकातून रात्री ११.०५ वाजता सुटून सकाळी ९.४६ वाजता मडगावला पोहचेल. यापूर्वी कोकणकन्या एक्स्प्रेस दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी मडगावला पोहचत होती. नव्या बदलानुसार २ तास १० मिनिटे वेळेची बचत होणार आहे. यामुळे लाडकी कोकणकन्या आता अधिकच लाडकी होणार आहे.





