Home आंतरराष्ट्रीय ‘गूगल’वरील १३३८ कोटींचा दंड कायम…!

‘गूगल’वरील १३३८ कोटींचा दंड कायम…!

नवी दिल्ली : भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) ‘गूगल’ला ठोठावलेला १३३७.७६ कोटी रुपयांचा दंड ‘राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय प्राधिकरणा’ने (एनसीएलएटी) बुधवारी कायम ठेवला. अँड्राइड मोबाइल साधनांसंदर्भात स्पर्धात्मक नियमांचा भंग केल्याचा ठपका गूगलवर ठेवण्यात आला होता.

राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय प्राधिकरणाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. सीआयआयने दिलेल्या आदेशांचे पालन करण्यासह, दंडाची रक्कम ३० दिवसांच्या कालावधीत जमा करण्यास गूगलला फर्मावण्यात आले आहे. गूगलने या आधी दंडाची १० टक्के रक्कम जमा केली आहे. ही १० टक्के रक्कम वगळून इतर रक्कम गूगलला भरावी लागणार आहे. स्पर्धा आयोगाने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी खंडपीठाने गूगलला ३० दिवसांचा कालावधीही दिला आहे.