भरधाव डंपर कुंपण तोडून घरात घुसला ; मालवण कोळंब येथील घटना | चालक दारूच्या नशेत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

72

मालवण : मालवण कोळंब मार्गावर एक डंपर (एमएच ०७ सी ६१३१) हा थेट दगडी कुंपण तोडून थेट एका घराच्या दारात घुसला. मोठा आवाज होताच घरातील सदस्य व शेजारील ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले. अपघाताची तीव्रता बघून सगळेच हादरून गेले. अपघातास कारणीभूत डंपर चालक दारूच्या नशेत असल्याचे बोलले जात होते. घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक बनले होते.

I

जे दगडी कुंपण तोडून डंपर घुसला त्या ठिकाणी मुले खेळतात एकत्र बसतात. नेमकी आजच त्या ठिकाणी मुले नव्हती. तसेच दगडी कुंपण नसते तर डंपर थेट घरातच घुसला असता. मोठा अपघात घडला असता अशी भिती व्यक्त करण्यात आली.

दरम्यान अपघाताची माहिती देऊनही पोलीस वेळेत न पोहोचल्याचे सांगत ग्रामस्थ अधिक संतप्त बनले. अखेर पोलीस दाखल झाले. त्यावेळी ग्रामस्थ यांनी आपला संताप व्यक्त करत या मार्गावरून अशी धोकादायक डंपर वाहतूक बंद करा. अशी मागणी लावून धरली. तर नशेत असलेल्या डंपर चालक यांची वैद्यकीय तपासणी तात्काळ करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली. माणसांचे जीव गेल्यास जबाबदार कोण ? आताच कारवाई करा. असे ग्रामस्थ यांच्या वतीने सांगितले जात होते. रात्री उशिरापर्यंत वातावरण तंग बनले होते.