सावंतवाडी : मोती तलावाच्या काठावर असलेलाच आठवडा बाजार योग्य आहे. त्यामुळे बाजाराचे अन्यत्र स्थलांतर करण्यास ठाकरे गटाचा विरोध आहे. त्यामुळे बाजार हलवू नये, अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहे, अशी भूमिका ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे मांडली.

दरम्यान शहरातील अन्य विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यावरून मतदारांची नजर हटविण्यासाठी दीपक केसरकरांनी बाजार स्थलांतरांवरून वाद निर्माण केला आहे, असे त्यांनी सांगितले.येथील आठवडा बाजार हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसे निर्देश मंत्री केसरकर यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर श्री. राऊळ यांनी या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केसरकर यांच्यावर जोरदार आरोप केले. शहरातील मल्टीस्पेशालिटी, बस स्थानक असे प्रश्न प्रलंबित असताना केसरकारांनी आठवडा बाजार हलवून नवीन वाद निर्माण केला आहे. हा आठवडा बाजार हलवताना कोणत्याही नागरिकांना विचारात घेतले नाही. अनेकांशी चर्चा केल्यानंतर ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणीबाजार हलवल्यानंतर त्या ठिकाणी सर्वसामान्य महिलेला पिशव्या घेऊन किंवा रिक्षाचे भाडे द्यावे लागणार आहे. त्यामुळे हा बाजार स्थलांतरित करू नये, अशी आमची मागणी आहे. याबाबत आम्ही जिल्हाधिकारी तसेच मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन आमची भूमिका कळविणार आहोत. त्यामुळे घेतलेल्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मी मागणी करणार आहे. असेही त्यांनी सांगितले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, तालुका संघटक मायकल डिसोजा, युवा सेना तालुका अधिकारी योगेश नाईक, युवा सेना तालुका समन्वयक गुणाजी गावडे, महिला तालुका संघटक रश्मी माळवदे, महिला शहर संघटक श्रुतिका दळवी, महिला उपतालुका संघटक साधना कळंगुटकर, शहर प्रमुख शैलेश गवंडळकर, शब्बीर मणियार, प्रशांत बुगडे, विनोद ठाकूर, फिलिप्स रोड्रिक्स आदी उपस्थित होते.





