मुंबईतील माहीम येथील अनधिकृत कबर बनतोय वादाचा मुद्दा | मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिला कबर तोडण्याचा आदेश

59

मुंबई : मुंबईमधील माहीम येथे समुद्रात एक अनधिकृत मकबऱ्याचे निर्माण केलं जात आहे आणि हा आता वादाचा मुद्दा ठरू लागला आहे . मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल त्यांच्या गुढीपाडवा निमित्त आयोजित सभेत या विषयावर सरकारला अल्टिमेटम दिला आहे . जर ही अनधिकृत कबर सरकारने तोडली नाही तर त्याच्या बाजूलाच एक विशाल गणेश मंदिर निर्माण केले जाईल , असा इशारा देखील राज ठाकरे यांनी दिला आहे.

यावर मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हे सर्व अनधिकृत बांधकाम हटवण्याची कारवाई करण्याचा आदेश दिला आहे . या संपूर्ण कारवाईसाठी एका पथकाची निर्मिती करण्यात आली आहे . मुंबई महापालिकेला यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री पुरवण्याचे आदेश दिले आहेत . तर मुंबई पोलिसांना यासाठी बंदोबस्त पुरवण्याची सूचना करण्यात आली आहे.

आता यावर राजकीय वाद देखील सुरू होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात हे अनधिकृत बांधकाम दोन वर्षांपूर्वी सुरू झाल्याचे म्हटले आहे आणि यावर तत्कालीन सरकारने का दुर्लक्ष केलं असा प्रश्न देखील विचारला . त्यामुळे आता हा राजकीय वाद चिघळणार अशी लक्षणे दिसू लागली आहेत . शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार भरत गोगावले यांनी सांगितले की, गेल्या सरकारने जरी याकडे दुर्लक्ष केले तरी शिंदे फडणवीस सरकार मात्र या मुद्द्यावर गप्प न बसता योग्य ती कारवाई करेल.