मुंबई : मुंबईमध्ये माहीम येथील मगदूम बाबाच्या दर्ग्यासमोर समुद्रामध्ये दिवसा ढवळ्या नवीन हाजी अली बांधली जात आहे . माझे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , महापालिका आयुक्त , मुंबई पोलीस आयुक्त यांना एकच सांगणे आहे की जर महिनाभरात हे अनधिकृत बांधकाम तोडले नाही , तर त्याच्या बाजूलाच एक विशाल गणपती मंदिर उभे केल्याशिवाय राहणार नाही , असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला . राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त बुधवारी सायंकाळी मुंबईतील शिवाजी पार्क येथे सभा घेतली . यावेळी बोलताना त्यांनी हा इशारा दिला.
सध्या परिस्थिती पाहता आताच्या आता विधानसभा निवडणूक घेऊन टाका आणि काय तो सोक्षमोक्ष लावा. जो राजकारणाचा चिखल तुम्ही केलाय तोच चिखल लोक तुमच्या तोंडात घालतील असे खडे बोल त्यांनी राजकारण्यांना या सभेत सुनावले. राज ठाकरे पुढे म्हणाले की मला धर्मांध हिंदू नको तर दुसऱ्या धर्माचा मान राखेल असा हिंदू हवा , मुस्लिम धर्मातील माणसे हवीत . पण जावेद अख्तरांसारखी माणसे हवीत . देशातील कोणत्याही नागरिकांनी पाकिस्तानात जाऊन खडे बोल सुनावले नाही पण ते जावेद अख्तर यांनी केले . असं सांगून सभेमध्ये याबाबतचा व्हिडिओ देखील दाखवण्यात आला.

सेना-भाजपने 2019 ला एकत्र निवडणूक लढवली महाराष्ट्रातल्या मतदारांनी युतीला मतदान केल्यानंतर मात्र यांचे खेळ सुरू झाले. आपल्याशिवाय सरकार स्थापन होत नाही याचा फायदा घेत अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची मागणी करण्यात आली. चार भिंतीत अमित शहा यांनी सांगितल्याचे सांगतात मग जेव्हा अमित शहा आणि नरेंद्र मोदी तुमच्या सोबत सभा घेत असताना पुढचा मुख्यमंत्री भाजपचा असेल असे बोलत होते तेव्हा आक्षेप का घेतला नाही ? लोकांनी युती म्हणून मतदान केले त्याचे काय ? असा खडखडीत सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता विचारला. राज ठाकरे यांची ही सभा प्रचंड गर्दीत संपन्न झाली.





