कणकवली : कणकवली : मालवण चिंदर येथील सामाजिक कार्यकर्ते, प्रथितयश व्यावसायिक, वैभवशाली पतसंस्थेचे संचालक संदिप हरी पारकर (वय ५८ रा. चिंदर भटवाडी) यांचे गुरुवारी सकाळी रेल्वेतन पडून निधन झाले. त्याच्या अपघाती मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.
कणकवली तालुक्यात साकेडी येथील घटना…..
मंगलोर रेल्वेने मुंबईहून कणकवलीच्या दिशेने येत असताना रेल्वेतून तोल जाऊन पडल्याने संदीप हरी पारकर (५८, चिंदर – भटवाडी, मालवण) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास कोकण रेल्वे मार्गावर कणकवली तालुक्यात साकेडी – बौद्धवाडी दरम्यान घडली.
संदीप पारकर हे रेल्वेतून खाली पडल्याचे रेल्वेतील प्रवाशांनी पाहिले. त्यानंतर याबाबत कणकवली रेल्वे स्टेशनला माहिती दिली. कणकवली रेल्वे पोलीस व कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मात्र संदीप यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले.
त्यानंतर संदीप पारकर यांचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी श्री. देसाई, श्री. माने, कोकण रेल्वे आरपीएफ चे राधेश्याम, प्रदीपकुमार आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
संदिप पारकर हे चिंदर मधील भगवती मंगल कार्यालय आणि पारकर टी हाऊसचे मालक होते. प्रत्येक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमात त्याचा हिरहिरिने सहभाग असायचा. ते भगवती उत्साही मंडळाचे खजिनदार आणि आधारस्तंभ होते. चिंदर येथील रामेश्वर देवस्थान समितीचे ते सचिव होते. तर आचरा येथील वैभवशाली श्री देव रामेश्वर पतसंस्थेचे ते संचालक होते. रवळनाथ मंदिराचा जिर्णोद्धार त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाला होता.
मनमिळाऊ आणि शांत स्वभावामुळे त्यांचा मित्र परिवार मोठा होता. कोणत्याही प्रसंगी मदतीसाठी ते सदैव तत्पर असायचे. त्यांच्या दुःखद निधनाने चिंदर गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली, मुलगा, भाऊ, बहिणी असा परीवार आहे.





