ब्युरो न्युज : काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांची तुलना दहशतवादी लादेन व कुख्यात गुंड दाऊदशी करुन आ. नितेश राणे यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले. राहुल गांधी यांच्यावर बोलण्याएवढी आ. नितेश राणे यांची राजकीय उंची व पात्रता नाही. त्यांनी आपली बडबड थांबवावी.. अन्यथा तुमचे वस्त्रहरण तुमच्याच भाषेत करु, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.
यासंदर्भात बोलताना लोंढे म्हणाले की, आ. नितेश राणे यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल वाह्यात बडबड केली त्यावरूनच त्यांची राजकीय अपरिपक्वता दिसून येते. दररोज कोणाला तरी अर्वाच्च शिव्या देण्यापलिकडे राणेंना काही येत नाही. राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलतात, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मुक्ताफळे नितेश राणे यांनी उधळली आहेत.
राहुल गांधी हे सरकारी घरातच राहून देशा विरोधात बोलतात असेही नितेश राणे म्हणाले. राहुल गांधी हे दिल्लीत सरकारी घरातच राहतात, अंधेरीतील राणेंच्या राज महालासारख्या अवैध बांधकाम केलेल्या घरात ते रहात नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
कारण ते गांधी आहेत राणे नाहीत. नेहरु – गांधी परिवाराने देशासाठी केलेला त्याग व बलिदान राणेंसारख्या बुद्धीच्या लोकांना या जन्मीतरी समजणे शक्य नाही. आ. नितेश राणेंनी राहुल गांधी यांची तुलना दहशतवाद लादेन, माफिया दाऊदशी केली त्याच राहुल गांधींच्या हाताखाली नितेश यांचे वडील नारायण राणे यांनी दहा – बारा वर्षे काम केले आहे, याची त्यांना माहिती नाही का? नसेल तर नितेश यांनी वडिलांना विचारून घ्यावे.
तसेच आ. नितेश राणे यांच्या बोलण्याला महत्व देण्याची फारशी गरज नाही पण त्यांनी आमच्या नेत्यांबद्दल विचार करुन बोलावे अन्यथा आम्हालाही तुमच्याच भाषेत उत्तर देता येते तेंव्हा तुम्हाला तोंड लपवायला जागा मिळणार नाही, हे लक्षात ठेवा, असेही अतुल लोंढे यांनी ठणकावून सांगितले.





