कणकवली : शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रविंद्र फाटक हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले होते. दरम्यान त्यांनी पक्ष बांधणीसाठी आपल्या पक्ष्याच्या कार्यकर्त्यांच्या गाठी – भेटी घेतल्या. कणकवलीत देखील श्री. फाटक यांचे भव्य दिव्य असे ढोल ताशांच्या गजरात स्वागत मारण्यात आले. श्री. फाटक यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह कणकवलीतील शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी यांनी श्री.फाटक यांचे स्वागत केले.
यावेळी बिग्रेडियर सुधीर सावंत, जिल्हाप्रमुख संजय आग्रे, महिला जिल्हा आघाडी प्रमुख वर्षा कुडाळकर, संदेश पटेल, बबन शिंदे, महेंद्र सावंत, भूषण परुळेकर, दामू सावंत, प्रशांत वनसकर, भास्कर राणे, बंटी तुळसकर, निलेश तेली, उमेश वांयगणकर, कणकवली,देवगड, वैभववाडी, मालवण, कुडाळ या तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री केसरकर म्हणाले, आम्ही कोणीही उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला सांगितला नव्हता. त्यांनी महाविकास आघाडीची साथ सोडावी हीच आमची मागणी होती. मात्र आमदार – खासदारांपेक्षा सोनिया गांधी आणि शरद पवार जवळचे वाटल्यामुळेच त्यांची ही अधोगती झाली, असा टोला शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी लगावला. दरम्यान मी स्वतःची “प्रॉपर्टी” विकून सिंधुदुर्गात शिवसेना वाढवली आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा खोक्यांचे आरोप करताना विचार करावा, अन्यथा मी असे “स्लोगन” तयार करेन की महाराष्ट्रात तुम्ही पुन्हा डोकं वर काढणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख पदी निवड झाल्यानंतर आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात दीपक केसकर बोलत होते.
महाविकास आघाडीचा मी विद्यमान आमदार असताना या ठिकाणी आलेल्या जयंत पाटलांनी “राष्ट्रवादीचा भावी आमदार” म्हणून एका महिला उमेदवाराला घेऊन प्रचार केला. त्यावेळी उद्धव ठाकरेंना आपल्या आमदारावर झालेल्या अन्याय दिसला नाही का? असा सवाल मंत्री दीपक केसरकर यांनी या दरम्यान उपस्थित केला. तर ठाकरेंचा सध्याचा पक्ष हा काँग्रेस, राष्ट्रवादीने विकत घेतला आहे, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी मी केलेल्या काजू धोरणाची खिल्ली उडवली. अजित पवारांनी ते रद्द केल्यानंतर आदित्य ठाकरे सुद्धा हसले होते. तो “व्हिडिओ” सर्वांना दाखवला पाहिजे. त्यांनी कोकणवासीयांचा अपमान केला होता, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान श्री. फाटक म्हणाले, सिंधुदुर्गातील शिवसेनेची संघटना पुन्हा एकत्र आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रयत्न करणार आहे. या जिल्ह्यात शिवसेनेला एक नंबरचा पक्ष बनविण्यासाठी आमचे सर्वांचेच प्रयत्न असणार आहेत. त्यासाठी येत्या काळात प्रत्येक तालुक्याचा मी दौरा करणार आहे, असा शब्द रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख तथा आमदार रवींद्र फाटक यांनी कार्यकर्त्यांना दिला. दरम्यान मुख्यमंत्री येत्या काळात कोकणचा दौरा करणार आहेत. त्यांचा पहिला मेळावा खेड येथे होणार आहे. त्यानंतर दुसरा मेळावा सिंधुदुर्गात घेण्यासाठी मी आग्रही असणार आहे आणि भव्य दिव्य मेळावा या ठिकाणी होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. श्री. फाटक हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असताना कणकवली येथील आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.





