कोटकामते ग्रामस्थांच्या एकजुटीला सलाम | २.६८ कोटीच्या रस्त्याचा अखेर शुभारंभ

देवगड : कोटकामते व नारींग्रे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे रस्ता पूर्णतः नादुरुस्त झालं होता. वारंवार पत्रव्यवहार करून देखील अधिकारी वर्ग लक्ष देत नसल्याने अखेर गावातील सर्व ग्रामस्थांनी पुढाकार घेत या रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरण होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सन 2020 पासून यासाठी संघर्ष सुरू केला मात्र अधिकारी वर्ग दाद देत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी लाक्षणीय उपोषण केले.तसेच गावच्या ग्रामस्थांनी गावात राबविलेला रस्ता एक अर्ज अनेक या उपक्रमाच्या माध्यमातून १००० अर्ज मुख्यमंत्री कार्यालयात सुपूर्द केले. गावातील ग्रामस्थांनी रस्त्याच्या कामासाठी राबविलेल्या उपक्रमाची व केलेल्या पाठपुराव्याची दखल मंत्रालय पातळीवर घेतली गेली. या रस्त्याच्या मजबुतीकरण , डांबरीकरणासाठी 2.68 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला. ग्रामस्थांनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नाला यश आल्याने आज होळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर कोटकामते ग्रामस्थांनी या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला.

कोटकामते नारिंग्रे रस्त्याचा लढा सन २०२० ला ग्रामस्थानी सुरू केला होता. ५ जानेवारी २०२१ रोजी ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले होते. बांधकाम अधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर अंदोलन मागे घेऊन या रस्त्याबाबतचा नव्याने प्रस्ताव सादर करण्याची मागणी अधिकारी वर्गाने केली होती. त्याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवगड यांच्या कडून सार्वजनिक बांधकाम उपविभाग कुडाळ यांच्या कडे प्रस्ताव सादरदेखील करण्यात आला. मे २०२१ नंतर प्रशासनाकडून अधिकारी वर्ग यांच्या कडून मिळणारी वेगवेगळी आश्वासने व वेळकाढूपणा ग्रामस्थांच्या लक्षात आला. त्या नंतर ग्रामस्थांनी लाक्षणीक उपोषणाचा मार्गदेखील अवलंबला.

तरीही वेगवेगळी कारणे देत ग्रामस्थांना चुना लावण्याचे काम चुना लावण्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आल्याचे दिसले.अखेर सर्व ग्रामस्थांनी एका वेगळ्या उपक्रमाची आखणी करुन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना रस्ता एक अर्ज अनेक या उपक्रमातून ग्रामस्थांचे एक हजार अर्ज नोव्हेंबर २०२१ ला मुख्यमंत्री कार्यालयास सुपूर्त केले. ग्रामस्थांनी एकीचे बळ वापरून राबविलेला या उपक्रमामुळे प्रशासन व सर्व शासकीय यंत्रणा खडबडुन जागी झाली.

कोटकामते गावातील ग्रामस्थांना या उपक्रमाबाबत संबंधित काही अधिकारी वर्गाकडून विचारणादेखील झाली.मात्र वरिष्ठांनी केलेल्या शाब्दिक सर्जरी नंतर अधिकारी वर्ग खडबडून जागे झाले.आता गावचा विकासासाठी आम्हीचं प्रयत्न करणार या इर्षेने पेटलेल्या ग्रामस्थांच्या एकजुटीला यश आले. या रस्त्याच्या कामासाठी 2.68 कोटी मंजूर झाले.यात काही शासकीय अधिकारी यांनी देखील सहकार्य केले.कोटकामते ते नारिंग्रे ह्या रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरणाच्या कामाचा
शुभारंभ ग्रामदेवता इनामदार श्री देवी भगवती मंदिराचे पुजारी गुरुजी केदार भटकामतेकर ह्यांच्या हस्ते झाले.यावेळी माजी सरपंच अरविंद माणगावकर, माजी उपसरपंच भालचंद्र (भाई ) मेस्त्री, शिर्के, ग्रा प सदस्य श्रीमती. सायली मोंडे व रुपेश आईर समाजसेवक सुनील कामतेकर, अण्णा पोकम, हरी घाडी, आबा चुनेकर, दिलीप आईर, श्रीधर वाळवे, भगवान घाडीगांवकर, अण्णा घाडीगांवकर, सुनील हिंदळेकर, नितीन दळवी, दिगंबर कदम, प्रतिक पाटकर, सागर मेस्त्री, राजन घाडीगांवकर, सोसायटी चेअरमन संजिव मेजारी आदी उपस्थित होते.