आसाम मधील माऊलीनॉग प्रमाणे सिंधुदुर्गातील परुळे स्वच्छ व परिपूर्ण गाव म्हणून झळकेल…!

परुळे बाजार ग्रामपंचायतला महाराष्ट्र माझा चा सलाम…!

मुख्यालय पत्रकार समितीचा अभ्यास दौरा संपन्न…!

गुरुप्रसाद दळवी/ सिंधुदुर्ग : निसर्गरम्य सागरी किनारपट्टी व दरी आणि डोंगराच्या कपारीत वसलेले नारळ, पोपळी, आंबा, काजू अशा वनराईत नटलेले सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील छोटेखाणी परुळे गाव व या गावाने लोकसभागातून केलेला विकास थक्क करणार आहे ! देशातील स्वच्छ गाव म्हणून झळकलेले आसाम मधील माऊली नॉग ची आठवण या गावच्या पत्रकार अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने झाली ! माऊलीनॉग हे छोटे गाव देशातील स्वच्छ गाव म्हणून जगाच्या नकाशावर झळकले व पर्यटक गाव बनले तसेच परुळे हे गाव पर्यटक गाव म्हणून झळकेल असा विश्वासही हा गाव व या गावातील विकास पाहताना वाटतो !

अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमासह स्वच्छतेत अग्रेसर राहिलेले हे गाव आता विभाग स्तरावर अन राज्यस्तरावर पोचले असून आजी माजी लोकप्रतिनिधींचा व लोकसभागाचा चांगला मिलाफ या गावांमध्ये असल्यामुळे अनेक उपक्रम या गावात दिसू लागले आहेत. सागरी किनारपट्टी लाभलेल्या व नारळ पोपळीच्या बागा असलेल्या या निसर्गरम्य गावाला आसाममधील माऊली नॉगं प्रमाणे पर्यटन नकाशावर झळकण्याची संधी मिळाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या सूचनाप्रमाणे स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांच्या पुढाकाराने झालेला हा पत्रकार दौरा अभ्यासपूर्ण ठरला. यावेळी वेंगुर्ला गटविकास अधिकारी एम बी भोई, कृषी विभागाचे सुतार, मुख्य सेविका सामंत, गावच्या सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दुधवडकर, या गावचे माजी सरपंच तथा सामाजिक आणि विकासात्मक कार्यात नेहमीच पुढे असलेले प्रदीप प्रभू, गावचे ग्रामसेवक शरद शिंदे, स्वच्छता विभागाचे प्रवीण काणकेकर, माजी सरपंच श्वेता चव्हाण, प्राजक्ता पाटकर, रुची राऊळ, शंकर घोगळे, प्रथमेश नाईक, महेश परुळेकर, भाई परुळेकर, ग्रामपंचायत सदस्य आधी सर्वांनीच उपस्थित राहत आपल्या गावातील विकासाबाबत ची माहिती दिली व पत्रकार दौऱ्याचे उस्फूर्त स्वागतही केले.

येसुकाका महिला काथ्या प्रक्रिया उद्योग संस्था परुळे या सहकारी संस्थेचा सुरू झालेल्या काथ्या उद्योग रोजगार निर्मितीचे एक केंद्र बनले आहे. काथ्या उद्योगाच्या या विस्तारीकरणात अनेक छोट्या छोट्या सुबक वस्तू घराघरात निर्माण होऊ लागल्या असून अन्य राज्यातील अनेक प्रकारची काथ्याची उत्पादने व सुबक वस्तू या गावात तयार होऊ लागल्या आहेत. नारळ पोफळीची पाने त्यांच्या पोई, नारळाची करवंटी या टाकाऊ वस्तूंपासून द्रोण, पत्रावळ्या, चमचे अशा इको फ्रेंडली वस्तूंची निर्मिती होऊ लागली असून या वस्तू या गावात होऊ लागल्या आहेत.

गावातील समाज मंदिर असो किंवा प्राथमिक शाळा असो किंवा गावचे अंगणवाडी असो सर्वच हायटेक प्रणालीवर विकसित करण्यात आली आहे. या छोट्या गावातील पटसंख्या पाहता छोट्या छोट्या मुलांना शिक्षणाचे धडे देताना वापरलेले हायटेक प्रणाली खूपच लक्षवेधी ठरत आहे. प्राथमिक शाळेतील डिजिटल क्लासरूम, इंटरनेट आणि संगणक प्रणालीचा वापर प्रोजेक्टर व सॉफ्टवेअर प्रणालीचा वापर करून प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जगाशी स्पर्धा करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर आतापासूनच शिकविला जात आहे. विद्यार्थी व शिक्षकांमधील शिस्त या शाळेत दिसली. विद्यार्थी शिक्षकाने केलेले स्वागत ही मनाला भावणारे होते.

राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका या वित्तीय संस्थांचे जाळे या गावात पाहायला मिळाले. भव्य असे वाचनालय, छोटेखानी बाजारपेठेत शुक्रवारचा भरणारा आठवडा बाजार, बाजारपेठेतील निर्माण केलेल्या सुविधा, गावातील नागरिकांसाठी सोयीच्या ठरल्या आहेत. या ग्रामपंचायतीने शोपेटीही कायमस्वरूपी उपलब्ध करून दिल्याने नागरिकांसाठी ती सोयीची ठरली आहे. 25 बंधारे बांधून या गावाने पाणी आडवा पाणी जिरवा हा संकल्प राबवित पाणीटंचाई दूर केले आहे. व स्वयंपूर्ण गाव म्हणून नागरिकांचे अर्थकारण बदलून विकासाकडे पुढे जात आहे.

ग्रामपंचायतीने राबविलेल्या अनेक उपक्रमातील नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असल्याने हा गाव विकासाकडे झेपावला आहे. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान सह अनेक अभियानातून जवळपास दीड कोटी रकमेची अनेक बक्षिसे या गावाने पटकावली आहेत. सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न असो किंवा विहिरीच्या पाणी शुद्धीकरणाचा विषय असो या सर्व कामे शास्त्रशुद्ध पद्धतीने या गावच्या ग्रामपंचायतीने विशेष लक्ष घालून केली आहेत. पाणी शुद्धीकरणासाठी वापरले तंत्र व त्यातील हायटेक प्रणाली खूपच लक्षवेधी ठरत आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या स्वच्छता अभियान कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांच्या पुढाकारामुळे मुख्यालय पत्रकारांचा एक अभ्यास दौरा बुधवारी या गावात झाला. विद्यमान सरपंच माजी सरपंच प्रभू, ग्रामसेवक, अभियान कक्षाची टीम या सर्वांनीच या दौऱ्यात सहभाग घेतला होता. या गावाने केलेले प्रगती तसेच राबवलेले उपक्रम या गावाने या दौऱ्यातील सहभागी मंडळींचे केलेले स्वागत सर्वांनाच आनंद देणारे ठरले.

या अभ्यास दौऱ्यात मुख्यालय पत्रकार समितीचे अध्यक्ष संजय वालावलकर, बाळ खळपकर, वरिष्ठ पत्रकार रवी गावडे, संदीप गावडे, विनोद दळवी, मनोज वारंग, गुरुप्रसाद दळवी, तेजस्विनी काळशेकर, सतीश हरमलकर आदि पत्रकारांनी सहभाग घेतला होता. परुळे या छोटा गावातील लोकप्रतिनिधी व नागरिकांचे आदरातिथ्य आनंददायी व मनाला भावणारे होते. त्यापेक्षा येथील लोकप्रतिनिधी व नागरिकांनी लोकसहभागातून केलेली कामे व नाविन्यपूर्ण उपक्रम पाहताना होणारा आनंद या गावाने राबविलेल्या दर्जेदार विकास कामांची पोहोच पावती देत होता!

या छोटेखानी गावाने लोकसहभागातून केलेली कामे व अनेक व्यवसायातून उद्योगांमधून निर्माण केलेल्या रोजगाराचे अनुकरण प्रत्येक गावाने करायला हवे व आपले गाव व आपल्या गावातील नागरिकांनी स्वयंपूर्ण बनायला हवे, असे मनोमन हा गाव कोणीही पाहिल्यानंतर वाटायलाच हवे, एवढे काम या गावाने केले आहे. त्यामुळे या गावाचे व या गावातील नागरिकांचे त्यापेक्षा पुढे असलेल्या येथील लोकप्रतिनिधी नेतृत्वाचे कौतुक करावे तेवढे थोडेेच आहे. महाराष्ट्र माझा चॅनल च्या वतीने या गावातील नागरीक तसेच लोकप्रतिनिधींना परुळे गावातील विकासात्मक वाटचाली करता शुभेच्छा!

काथ्या उद्योगाचा हब परुळे गाव बनेल…!

काथ्या उद्योगात परुळे गावातील महिलांनी एक चळवळ म्हणून सहभाग घेतला आहे. हे गाव काथ्या उद्योगाचे एक हब बनावे अशी महत्त्वाकांक्षा येथील महिलांनी व्यक्त केली आहे. केरळ राज्यातून काथ्या उद्योगापासून विविध वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण घेऊन आलेल्या महिलांनी या भागात सुबक वस्तू तयार केले आहेत. पायपुसणी पासून छोट्या-मोठ्या विविध वस्तू व त्यांचे प्रदर्शन भुरळ घालणारे व गावातील महिलांची कर्तबगारी दाखविणारे आहे. काथ्या निर्मितीचा कारखाना व त्यातून निर्माण होणारा काथ्या व कोकोपीट उत्पादन या गावच्या अर्थक्रांतीमध्ये मोठा वाटा उचलत आहे. केंद्रीय सूक्ष्म लघु उद्योग मंत्री नारायण राणे तसेच क्वायर बोर्ड या विभागाने केलेली मदतही या उद्योगाला चालना देणारे ठरली आहे अशी प्रतिक्रिया या काथ्या उद्योगाच्या प्रमुख रुची राऊळ यांनी दिली. क्वायर बोर्डाच्या मदतीने या गावातील 20 महिलां पुढच्या आठवड्यात पश्चिम बंगालमधील उडीसा येथे काथ्या प्रशिक्षणासाठी जात असल्याचेही त्यांनी सांगितले.