कणकवली : गेली ३० वर्षे अव्याहतपणे वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने नाट्य महोत्सवाचे आयोजन करून खऱ्या अर्थाने नाट्य चळवळीच्या संवर्धनाचे काम केले आहे. या देशात अनेक अभिनेते झाले, मात्र त्यांनी थिएटर बांधले नाहीत. परंतु ते काम कणकवलीकरांनी करून दाखवले. त्यामुळेच आज कणकवली एक महाराष्ट्रातील प्रमुख सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जात आहे. प्रतिष्ठानच्या या महोत्सवात यापुढे नव्या नाट्यकर्मीना संधी द्यावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक, रंगकर्मी अतुल पेठे यांनी केले.
वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे २३ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत मच्छींद्र कांबळी स्मृती नाट्योत्सवाचे आयोजन करण्यात आले. असे नाट्योत्सव सहा दिवसात नऊ नाटके सादर होणार आहेत. या नाट्योत्सवाचा शुभारंभ गुरुवारी सायंकाळी ८:३० वा. अतुल पेठे, दिग्दर्शक सपन सारण यांच्या हस्ते झाला. प्रतिष्ठांनचे अध्यक्ष वामन पंडित, कार्यवाह नारायण देसाई, आदी उपस्थित होते.
नाट्य चळवळीवर प्रेम करणारी माणसे या ठिकाणी पाहायला मिळाले ते श्री. पेठे यांनी सांगितले. प्रास्ताविक वामन पंडित यांनी केले. या कार्यक्रमाला नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





