जिल्हाधिकाऱ्यांना अटक करा : राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे आदेश

116

चंद्रपूर : चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करण्याचे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना दिला आहे. आयोगाने हा आदेश जिवती तालुक्यातील कुसुंबी या गावातील आदिवासींच्या जमीन प्रकरणात दिला आहे. विनोद खोब्रागडे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.

या प्रकरणात आयोगाने जिल्हाधिकारी यांना १६ फेब्रुवारीला आयोगापुढे हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र आयोगापुढे जिल्हाधिकारी स्वतः हजर झाले नाही, त्यांच्या जागी उपजिल्हाधिकारी तृप्ती सूर्यवंशी हजर झाल्या होत्या. त्यामुळे आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना अटक करून २ मार्च पर्यंत आयोगापुढे सादर करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले.

पूर्वीच्या माणिकगड आणि आताच्या अल्ट्राटेक सिमेंट उद्योग समूहाने कुसुंबी येथील आदिवासींच्या जमिनींवर ३६ वर्षांपासून अवैध कब्जा केल्याचा या पीडित आदिवासींचा आरोप आहे आणि या प्रकरणात गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन लढा सुरु आहे. मात्र आता थेट जिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्याचे आयोगाने आदेश दिल्याने प्रशासनात मोठी खळबळ माजली आहे.