कुणकेश्वरच्या सौंदर्याची जगाला भुरळ…!

241

देवगड, स्वप्निल लोके | मयूर ठाकूर : पिंडीवर फुल शोभे जसं जाईचं, वेड मला लागलं या कुणकेश्वराचं…! या उक्तीप्रमाणे कुणकेश्वरचे सौंदर्य जगाला भुरळ पाडतेय… कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा विशेष…

दक्षिण कोकणची काशी म्हणून उल्लेख असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिराची ख्याती जगप्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून कुणकेश्वर ची गणना प्रामुख्याने होते दिवसा गणित असंख्य पर्यटकांचा कुणकेश्वर पुढे दिसून येतो. कुणकेश्वर मंदिरात अनेक वार्षिक उत्सव होत असतात. मात्र सर्वात मोठा उत्सव म्हणजे कुणकेश्वर महाशिवरात्री  यात्रा..! अथांग सागराच्या किनाऱ्यावर वर्षानुवर्षे अजस्त्र लाटांचा सामना करत वसलेले हे कुणकेश्वर मंदिर आणि या ठिकाणी होणाऱ्या महाशिवरात्री यात्रेची गर्दी म्हणजे शिवतीर्थावर जमलेला शिवभक्तांचा कुंभमेळाच म्हणावा लागेल. यावर्षी 18 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत श्री देव कुणकेश्वर ची महाशिवरात्री यात्रा संपन्न होत आहे. सोमवार हा शंकराचा वार असल्यामुळेच याच दिवशी सोमवती अमावस्या असल्याने यावर्षी पवित्र तीर्थस्थानासाठी शिवतीर्थावर भाविकांची प्रचंड गर्दी होणार अशा या श्री क्षेत्र कुणकेश्वर बद्दल बोलावं लिहावं तेवढं थोडंच …!

कनक वृक्षाची राई येथे होती या कनक वृक्षाच्या राईवरूनच येथे असलेल्या शंकराच्या स्थानाला व या गावाला कुणकेश्वर हे नाव पडले. कनक वृक्षाच्या राईमध्ये एक गाय चरायला येत असे. मात्र ती कधीही घरात दूध देत नसे. या गाईच्या दुधाचे होते तरी काही हे पाहण्यासाठी त्या गाईच्या मालकाने पाहण्याचे ठरवले. व पाळत ठेवून तो गाईच्या पाठीमागून निघाला तो कणक वृक्षाच्या राईत. राईत येताचं त्याला एक स्वयंभू पाषाणावर गाईने पान्हा सोडल्याचा त्याला दिसले. हातातील काठीने त्या पाषाणावर जोराने प्रहार त्यांनी केला. त्याबरोबर पाषाणातून एक तुकडा उडून त्यातून रक्त होऊ लागले.हे पाहताच तो गृहस्थ आश्चर्यचकित झाला. व त्या पाषाणाला शरण गेला त्यानंतर तो रोज दिवाबत्ती करून पूजा अर्चा करू लागला.अशी दंतकथा श्री देव कुणकेश्वराची आहे.

साधारणत: ११ व्या शतकात हे मंदिर बांधले गेले असून या मंदिराची संपूर्ण बांधणी ही द्रविडीयन (दक्षिणात्य) पद्धतीची आहे. मंदिर मंदिराचा काही भाग जीर्ण झाल्यामुळे १७ व्या शतकात या मंदिराच्या काही भागांची दुरुस्ती ही करण्यात आल्याचा उल्लेख आहे. मात्र त्यानंतर मंदिरावर वापरण्यात आलेली लाकूड सामान हे पूर्णतः जीर्ण झाल्यामुळे अखेर या मंदिराच्या नव्याने दुरुस्ती करण्याचा निर्णय कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून घेण्यात आला. आणि टप्प्याटप्प्याने दुरुस्ती करण्यात आली. आणि कुणकेश्वर मंदिराचे चित्र बदलत गेले. अर्थातच मंदिराचे स्वरूप बदलुन नव्या आकर्षक मंदिराचे स्वरूप आल्याने कुणकेश्वरची महती, व्याप्ती वाढत गेली. आणि श्री क्षेत्र कुणकेश्वरचा चेहरामोराच बदलुन गेला. कालांतराने सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपास आला. आणि या पर्यटन जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे जागतिक धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून श्री क्षेत्र कुणकेश्वरचा प्रथम नामोल्लेख झाला.

कुणकेश्वर मंदिर परिसरात अनेक छोटी मंदिरे आहेत तीही आता सुशोभित करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर समुद्रमार्गे देवगडच्या दिशेने जाताना डोंगर कड्यावर वसलेले लहान पेशवेकालीन गणपती मंदिर आहे. कुणकेश्वर मंदिरापासून साधारणत: 200 ते 300 मीटर अंतरावर प्राचीन गुहा आहे. या गुहेत पांडवकालीन लेणी काळ्या दगडावर कोरलेली आहेत. याच गुहेच्या उजव्या बाजूस असलेल्या भोगदयाचा थेट संपर्क वाडा येथील विमलेश्वर मंदिराशी येतो. कुणकेश्वर समुद्रकिनारी 100 पेक्षा जास्त आणि 108 पेक्षा कमी अशी कोरीव शिवलिंगे एका रात्री कोरलेली आहेत म्हणून या कुणकेश्वरच्या ठिकाणाला काशीचा दर्जा प्राप्त झाला आहे.

कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रेच्या निमित्ताने कुणकेश्वरला येणाऱ्या सर्व रस्त्यांवर आकर्षक स्वागत कमानी ,स्वागताचे बॅनर व विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. मंदिर परिसरातही विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. सर्व शासन प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी कार्यरत आहेत. यात्रेत येणाऱ्या कोणत्याही भाविकांना कोणत्याही स्वरूपाची अडचण येणार नाही. याची दक्षता प्रशासन कुणकेश्वर ग्रामपंचायत व कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्यावतीने घेण्यात आलेली आहे. दोन वर्षाच्या कोरोना महामानीनंतर कुणकेश्वरच्या या वर्षीच्या यात्रेसाठी शनिवार रविवार सुट्टीचा वार असल्यामुळे व सोमवारी सोमवती अमावस्येला पवित्र तीर्थस्थानाचा योग असल्यामुळे शिवतीर्थावर विक्रमी गर्दी होणार अशी आशा देवस्थान ट्रस्ट करून व्यक्त करण्यात आलेली आहे. या श्री देव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सवास महाराष्ट्र माझा परिवाराकडून देखील हार्दिक शुभेच्छा …!